भोर ! आठवडे बाजार उद्यापासून पूर्ववत होणार सुरू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर शहरातील महत्वाच्या बाजारपेठेत अनेक वर्षापासून सुरू असलेला आठवडे बाजार कोरोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मागील एक महिना  स्थलांतरीत करून भोर बाजार समितीच्या आवारात बसविला होता.तर दोन आठवडे नगरपरिषदेने बंद ठेवला होता.यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.मात्र सद्या कोरोना रुग्णांची संख्या मंदावली असल्याने शहरातील मंगळवारचा आठवडे बाजार दि-१५ फेब्रुवारी पुन्हा पूर्ववत करून बाजारपेठेत बसविण्यात येणार आहे असे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी सांगितले.
           शहरातील आठवडे बाजार काही दिवस बंद तर काही मंगळवार शहराबाहेर स्थलांतरित करण्यात आला होता.यामुळे शहरातील बाजारपेठेतील व्यापारी यांच्या व्यापारावर परिणाम होऊन नुकसान होत होते. तसेच ग्राहकांना शहराबाहेरील बाजारात ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता.मात्र नागरिकांच्या त्रासाचा विचार करून व नागरिकांच्या आठवडे बाजार पूर्ववत व्हावा या मागणी नुसार प्रांताधिकारी राजेंद्र कचरे,तहसीलदार सचिन पाटील,मुख्याधिकारी हेमंत किरुळकर,पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी संयुक्तपणे बैठक घेऊन आठवडे बाजार सुरू होण्यासाठी सकारात्मक विचार विनिमय करून मुख्याधिकारी यांनी बाजारपेठेतील आठवडे बाजार पूर्ववत सुरू करण्याचे आदेश दिले.
          कोरोना रुग्ण मंदावले आहेत संसर्ग संपुष्टात आलेला नाही. सद्या तालुक्यात तिसऱ्या लाटेतील रुग्ण संख्या मंदावलेली आहे.मात्र कोरोना संसर्ग संपुष्टात आलेला नाही.नागरिकांच्या आठवडे बाजाराची गैरसोय पाहता आठवडे बाजार पेठेत पूर्ववत सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.नागरिकांनी गर्दी न करता नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले आहे.

                                   
To Top