सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जेजुरी : प्रतिनिधी
पुणे जिल्हा धर्मादाय सामुदायिक विवाह समिती आणि श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी यांच्या वतीने गोर गरीब सर्वसामन्य जनतेसाठी खर्चाची बचत व्हावी यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून आदर्श निर्माण केला आहे. तसेच या सोहळ्यात देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या शहीद कुटुंबियांचा मल्हार रत्न पुरस्कार देवून सन्मानित करून देवसंस्थानने समाजभान राखले आहे असे विचार बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ मिलिंद मोहिते यांनी व्यक्त केले.
श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी व पुणे धर्मादाय सामुदायिक विवाह समितीच्या वतीने जेजुरी येथे सर्वधर्मीय बिगरहुंडा मोफत सामुदायील विवाह सोहळा तसेच २६ / ११ च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मल्हार रत्न पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहीद विजय साळसकर,बाळसाहेब भोसले,योगेश पाटील,अंबादास पवार,राहुल शिंदे,रघुनाथ चित्ते,विजय खांडेकर,मुकेश जाधव,प्रकाश मोरे,बापूराव धूरगुडे यांच्या कुटुंबियांना अप्पर पोलीस अधीक्षक डॉ मिलिंद मोहिते यांच्या हस्ते मल्हार रत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
यावेळी उपस्थितांनी शहिदांना अभिवादन केले. तसेच यावेळी ६ मंगलपरीनय व ११ वैदिक पद्धतीने असे १७ विवाह यावेळी संपन्न झाले.
यावेळी श्री मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त पंकज निकुडेपाटील,विश्वस्त,शिवराज झगडे,संदीप जगताप, डॉ राजकुमार लोढा, अशोकराव संकपाळ,तुषार सहाने,प्रसाद शिंदे,पदसिद्ध विश्वस्त व नगरध्यक्षा वीणा सोनवणे, मुख्याधिकारी राजेंद्र जगताप,व्यवस्थापक सतीश घाडगे, जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर व मोठ्या संख्याने वऱ्हाडी,भाविक व नागरिक उपस्थित होते.
प्रमुख विश्वस्त पंकज निकुडेपाटील यावेळी बोलताना म्हणले कि, जेजुरी देवसंस्थानच्या वतीने आत्ता पर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे,गुरुवारी नारायण महाराज,जेष्ठ चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांना मल्हार रत्न पुरस्कार देवून सन्मानित केले आहे. देशासाठी शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना मल्हार रत्न पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. कष्टकरी,शेतकरी,कामगार आदींना विवाहासाठी कर्जाचा बोझा पडू नये श्रम,वेळ,पैसा यांची बचत व्हावी यासाठी देवसंस्थानच्या वतीने तिसऱ्यांदा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
. देवसंस्थानचे सर्व विश्वस्त,अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांच्या परिश्रमातून हा सोहळा उत्कृष्ट रीतीने पार पडला. या विवाहा वेळी अक्षदा ऐवजी फुलांचा वापर करून अक्षदासाठी वापरला जाणारा ३०० किलो तांदूळ अनाथ आश्रमाला देण्यात येणार असल्याचे विश्वस्त शिवराज झगडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज निकुडेपाटील ,सूत्रसंचालन विश्वस्त शिवराज झगडे यांनी केले.तर आभार संदीप जगताप यांनी मानले