सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधुमती पलंगे यांची दहा विरूद्ध सात मताने निवड झाली तर उपनगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीच्याच शिवाजीराव शेळके-पाटील यांचीही दहा विरूद्ध सात मताने निवड करण्यात आली.
आज झालेल्या नगराध्यक्ष- उपनगराध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेत अपेक्षेप्रमाणेच दहा नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीने दोन्ही पदावर आपलेच उमेदवार निवडून आणण्यात यश मिळवून लोणंद नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावला.
नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून प्रभाग क्रमांक सात मधून निवडून आलेल्या मधुमती पलंगे यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून राष्ट्रवादीचे रवींद्र क्षीरसागर तर अनुमोदक म्हणून राष्ट्रवादीच्याच नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या दुसऱ्या उमेदवार सीमा वैभव खरात यांनी सह्या केल्या होत्या. तर काँग्रेसकडून अर्ज दाखल केलेल्या दिपाली निलेश शेळके यांच्या अर्जावर सूचक म्हणून प्रविण व्हावळ यांची तर अनुमोदक म्हणून आसिया बागवान यांनी सही केलेली.
आज लोणंद नगरपंचायतच्या सभागृहात प्रांत शिवाजीराव जगताप आणि प्रभारी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी विषेश सभेला सुरवात झाली यामधे राष्ट्रवादीच्या उमेदवार मधुमती पलंगे यांनी दहा मते मिळवत बाजी मारली तर विरोधात असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार दिपाली निलेश शेळके यांना सात मते पडली. तर उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून शिवाजीराव शेळके यांनी भाजपच्या उमेदवार दिपाली संदिप शेळके यांचा दहा विरूद्ध सात अशा मतांनी पराभव केला. या निवडीवेळी सभागृहात भरत शेळके,रविद्र क्षीरसागर, सचिन शेळके,गणीभाई कच्छी,भरत बोडरे, सुप्रिया शेळके, सीमा खरात,राशिदा इनामदार, प्रविण व्हावळ,आसिया बागवान,तृप्ती घाडगे, राजश्री शेळके,ज्योती डोनीकर आदी नगरसेवक उपस्थित होते.
सध्या लोणंद नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक दहा नगरसेवक आहेत तर भाजपा आणि काँग्रेसचे प्रत्येकी तीन नगरसेवक असून एक अपक्ष नगरसेवक असे बलाबल आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्याच उमेदवारांची नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदी वर्णी लागणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. आज झालेल्या निवडीनंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष मधुमती पलंगे व उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके-पाटील यांचे विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर जननायक आमदार मकरंद पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष दयानंद खरात ,लोणंद शहराध्यक्ष विनोद क्षीरसागर , डाॅक्टर नितीन सावंत आदींनी अभिनंदन केले.