सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
जावली : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या सातारा व जावली तालुक्याचे वतीने सातारा उपविभागातील पोलिस पाटील भर्ती परीक्षेच्या घोटाळ्याची चौकशी करून फेर निवडीची मागणी केली असून दोषी च्या कारवाई ची मागणी
सातारा उपविभागातील जावली व सातारा तालुक्यातील रिक्त पोलिस पाटील पदाच्या भरतीची प्रक्रिया सुरू असून दि. २२ फेब्रुवारी रोजी तसा जाहिरनामा निघाला आहे. सदर जाहिरनाम्यातील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा १३ मार्च २०२२ रोजी उपविभागीय (प्रांत ) कार्यालय सातारा यांचेमार्फत घेण्यात आली. सदर परीक्षा दिलेल्या अपात्र उमेदवारांना त्यांचे मार्क न कळवता पात्र उमेदवारांची यादी सातारा प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी प्रसिद्ध करून लगेच १६ मार्च रोजी तोंडी परिक्षेसाठी बोलावले. जाहिरनाम्यात प्रत्यक्षात मात्र तोंडी परिक्षेची तारीख ही 22 मार्च ही घोषीत करण्यात आली होती.तरीही सातारा प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांना कोणती घाई लागली होती याचे कारण कळाले नाही.
ग्रामिण भागातील अतिशय संवेदनाशील अशा पोलिस पाटील पदाच्या निवडीबाबत सातारा उपविभागाने जवळपास ८०ते ९० उमेदवारांना मार्क न कळवता घरचा रस्ता दाखवून वशिल्याचे व अपात्र उमेदवारांना तोंडी परिक्षेला पात्र करून प्रत्यक्षात प्रतिभावंत उमेदवारांवर अन्याय केल्याची व भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याची भावना यावेळी अनेक उमेदवारांनी बोलून दाखवली.
यामुळे भाजपा सातारा तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे व जावली तालुका अध्यक्ष श्रीहरी गोळे यांनी निवेदनाद्वारे सदरची पोलिस पाटील भरती प्रक्रिया सदोष असल्यामुळे त्याची सखोल चौकशी करून ती रद्द करण्याची मागणी केली. तसेच सातारा प्रांत अधिकारी मिनाज मुल्ला यांच्याकडून सदर परीक्षेचा चार्ज काढून दुसऱ्या सक्षम अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पुन्हा नव्याने पारदर्शक पणे पोलिस पाटील निवडीची परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी पोलिस पाटील भरती प्रक्रियेचे जिल्ह्याचे प्रमुख उपजिल्हाधिकारी (महसूल) आवटे साहेब यांचेकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी जिल्हा भाजपा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, किरण भिलारे तालुका उपाध्यक्ष , सचिव प्रदिप बेलोशे, सरचिटणीस गणेश पार्टे, कामगार आघाडीचे सरचिटणीस जगनभाई गावडे, भाजपा पदाधिकारी आणि पोलिस पाटील भरतीमधील अन्यायग्रस्त उमेदवार मोठ्यासंख्येने उपस्थितीत होते. सदर निवेदनाची दखल विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रविणजी दरेकर यांनीही घेतली.