सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
चमत्कारामागे भौतिक वा रासायनिक क्रिया असतात किंवा हातचलाखी तरी असते. अशा चमत्काराचा दावा करणारे महाराज लोक बदमाश असतात. लोकांनी अशा भोंदूवर अजिबात विश्वास ठेवू नये. प्रत्येक गोष्टीमागचा कार्यकारणभाव तपासला पाहिजे, चिकित्सा केली पाहीजे. यातूनच वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो, अशी भूमिका 'अंनिस'चे राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख यांनी मांडली.
बारामती येथे युवा चेतना सामाजिक संस्था आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बारामती शाखेद्वारे एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी देशमुख 'चमत्कारामागील विज्ञान' या बोलत होते. याप्रसंगी ज्ञानदेव सरोदे, हरिभाऊ हिंगसे, तुकाराम कांबळे, बाळकृष्ण भापकर, सुनील महामुनी, रंगनाथ नेवसे, दिनेश आदलिंग, भारत विठ्ठलदास, शिवांजली जगताप, पूनम देशमुख उपस्थित होते.
शिबिरात प्रशांत पोतदार यांनी जादूटोणा विरोधी कायदा या विषयाची सविस्तर माहिती दिली. अंनिसच्या जिल्हाध्यक्ष नंदिनी जाधव यांनी 'स्त्रिया आणि शोषणाच्या बेड्या' या विषयावर व्याख्यान दिले. अनिल वेल्हाळ यांनी 'अंगात येणे, झपाटणे आणि मनोविकार' या विषयावर सादरीकरण केले. श्रीपाल ललवाणी यांनी 'अंनिसची देव-धर्मविषयक भूमिका' या विषयावर विवेचन केले. युवा चेतना सामाजिक संस्थेचे प्रमुख मनोज पवार यांनी स्वागत केले. प्रज्ञा काटे यांनी सूत्रसंचालन केले तर सुषमा बनकर यांनी आभार मानले. निकिता भापकर, गौरी गुरव, रागिणी वसव, प्रियांका सासवडे, ऋतुजा घोलप, पूजा दीक्षित, विशाल लोणकर, सतीश पवार, जयदीप नागवडे यांनी संयोजन केले.