अभिमानास्पद ! महाराष्ट्रातील ९० टक्के ऊस क्षेत्र हे पाडेगाव येथील संशोधित वाणांचे : डॉ. भरत रासकर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
लोणंद प्रतिनिधी 
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव आणि ऊस विकास संचालनालय, लखनऊ, उत्तरप्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विभागातील अधिकारी यांचेसाठी ऊस उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम दि. २२ व २३ मार्च, २०२२ रोजी आयोजीत करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. भरत रासकर, ऊस विशेषज्ञ व प्रमुख ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे श्री. भास्कर कोळेकर, उपविभागीय कृषि अधिकारी, फलटण यांनी मार्गदर्शन करून प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरूवात केली. 
         यावेळेस मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव चे ऊस विशेषज्ञ डॉक्टर भरत रासकर यांनी प्रशिक्षणार्थींना माहीती देताना ऊसाच्या अधिक उत्पन्न व अधिक साखर उतारा देणाऱ्या नवीन सुधारीत वाणांचा विकास करणे तसेच उत्पादन तंत्रज्ञान यावर पाडेगाव येथील संशोधन केंद्रामधे प्रामुख्याने भर दिला जात असल्याचे सांगत या संशोधन केंद्राने १५ वाण आणि १०२ उत्पादन तंत्रज्ञान देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिले असल्याचे सांगितले तसेच महाराष्ट्रात ऊसाच्या ज्या दोन प्रमुख जाती वापरल्या जातात त्या २००७ साली दिलेली फुले- २६५ व १९८६ साली दिलेली को- ८६०३२ ह्या पाडेगाव संशोधन केंद्राने दिलेल्या जाती आहेत. सध्या महाराष्ट्रात ५० टक्के पेक्षा अधिक क्षेत्रात को-८६०३२ या वाणाची लागवड आहे तर फुले-२६५ या वाणाखाली ३४ टक्के क्षेत्र आहे. तसेच ९२००५ आणि एमएच १०००१ या दोन वाणांखालीही महाराष्ट्रातील काही क्षेत्र आहे. महाराष्ट्रातील एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी सुमारे ९० टक्के हे पाडेगाव येथील संशोधित वाणांचे असल्याची माहीती उपस्थितांना दिली. 
        या प्रशिक्षण कार्यक्रमात जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन, ऊस वाणाची निवड आणि सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञान, ऊस उत्पादन तंत्रज्ञान, ठिबक सिंचनाचा वापर, ऊस शेतीसाठी यांत्रिकीकरण या विषयावर पाडेगावच्या शास्त्रज्ञांनी दि. २२ मार्च रोजी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे ऊसातील तणनियंत्रण, खोडवा व्यवस्थापन, ऊसाला तुरा येण्याची कारणे व उपाय, ऊसाचे पीक संरक्षण आणि ऊसावरील फवारणी करीता ड्रोन प्रात्यक्षिक दि. २३ मार्च, २०२२ रोजी चातक इनोव्हेशन यांनी दाखविले. कार्यक्रमात सातारा जिल्हयातील एकूण २५ कृषि अधिकारी यांनी सहभाग नोंदविला. 
       यावेळी सर्व प्रशिक्षणार्थीना ऊस मार्गदर्शीका आणि कृषिदर्शनी यांचे वाटप पाडेगाव केंद्राचे प्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले. पाडेगावचे शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे, कृषिविद्यावेत्ता डॉ. रामदास गारकर, ऊस पैदासकार डॉ. सुरज नलावडे, ऊस रोग शास्त्रज्ञ डॉ. दिपक डामसे, ऊस शरीरक्रिया  शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय थोरवे,  डॉ. माधवी शेळके, श्रीमती. उज्वला गावीत तसेच डॉ. तुळशीदास बास्टेवाड यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अभिजीत पाटील आणि श्रीमती कोमल घोडके या कृषि अधिकारी व प्रशिक्षणार्थी यांनी प्रशिक्षणाची गरज निश्चितच होती आणि भविष्यात अशा पध्दतीचे प्रशिक्षण कार्यक्रम पाडेगाव संशोधन केंद्राने आयोजीत करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 
           यावेळेस सर्व सहभागी प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र देवून कार्यक्रामाचा समारोप झाला. सर्व कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा विस्तार केंद्राचे प्रमुख डॉ. दिपक डामसे आणि कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ. दत्तात्रय थोरवे यांनी केले.
To Top