सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
'विठू माऊली गृह उद्योग' या संस्थेने मेणबत्ती उद्योगाच्या नावाखाली शेकडो महिलांची फसवणूक केली होती. याप्रकरणी पोलिसांनी मदत करावी अशी मागणी गेली अडीच वर्ष महिला करत होत्या. अखेर आज वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात 'विठू माऊली'चा मास्टरमाईंड अशोक उर्फ राजन भिसे व एजंट अभिजित डोंगरे यांच्यासह एकूण सहा जणांवर फसवणुकीचा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच महिलेची ७ लाख ३७ हजारांची फसवणूक झाली आहे.
लोणंद (ता. खंडाळा जि. सातारा) येथील 'विठू माऊली' या संस्थेने बारामती, पुरंदर, खंडाळा, फलटण तालुक्यातील शेकडो महिलांची फसवणूक केली आहे. संस्थेचा प्रमुख राजन भिसे व त्याचा एजंट अभिजित डोंगरे यांनी महिलांना 'कच्चा माल देतो मेणबत्त्या बनवून द्या' असे आमिष दाखविले. मेणबत्तीनिर्मितीचा साचा, प्रशिक्षण, कच्चा माल देऊ करत महिलांकडून प्रत्येकी दहा ते चौदा हजार रूपये उकळले. ज्या महिलांकडे रोख रक्कम नव्हती त्यांना एका मल्टीस्टेट बँकेचे वीस हजारांचे कर्ज मिळवून दिले. सुरवातीला काहींचा माल उचलला आणि नंतर गायब झाले. महिलांच्या तक्रारी प्राप्त झाल्या मात्र कागदोपत्री पुरावे उपलब्ध न झाल्याने गेली अडीच वर्ष दखल घेतली गेली नाही. दरम्यान, वैशाली अरूण जगताप (रा. निंबुत ता. बारामती) यांनी मात्र चिकाटीने पाठपुरावा करत कागदोपत्री पुरावे सादर करत पोलिसांना दखल घ्यायला भाग पाडले. त्यामुळे अशोक भिसे, सविता अशोक भिसे, गजराबाई मानसिंग भिसे, मंगल लकडे, सोनाली रमेश सागर व अभिजित डोंगरे यांच्या विरोधात पोलिसांनी आज पहिला गुन्हा दाखल केला.
जगताप यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मेणबत्ती उद्योगासाठी गोडावून उपलब्द करून द्या आणि मेणबत्तीचा कच्चा माल विकत घ्या. तो माल महिलांना वाटप करून तुम्हाला पंधरा टक्के नफा देतो असे आमिष भिसे याने दाखविले. कच्च्या मालासाठी भिसे याच्या लोणंदमधील मालोजी बँक व अजित मल्टिस्टेट बँक येथील खात्यावर एकूण पाच लाख भरले. त्यापोटी तीन टन कच्चा माल आम्ही भाड्याने घेतलेल्या गोडावूनमध्ये टाकला. तो सर्व माल टप्प्याटप्प्याने भिसे, डोंगरे यांनी उचलून महिलांमध्ये वितरीत केला. मात्र त्यापोटी पाच लाख व त्यावरील नफा देऊ-देऊ करत लांबविले. जगताप यांना मेणबत्त्या बनवण्याच्या कामात घेतले. त्यापोटी जगताप यांच्या मुलीस दहा साचे व कच्चा माल आणून दिला. त्यापोटी १ लाख ४ हजार रोख घेतले. पक्का माल तयार झाल्यावर १ लाख ३३ हजारांच्या मेणबत्त्या नेल्या मात्र त्याचे पैसे मागूनही मिळाले नाहीत. सप्टेंबर २०१९ पासून भिसे कार्यालय बंद केले.
करंजेपूल पोलिस दूरक्षेत्राचे फौजदार योगेश शेलार म्हणाले, सदर गुन्हा लोणंद पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. अन्य महिलांनीही याबाबतच्या तक्रारी द्याव्यात.