सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सातारा : प्रतिनिधी
साताऱ्यातील जिल्हा क्रीडा संकुलात ६४ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लागला आहे असून अंतिम लढतीत महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने जिंकली. तो प्रदार्पणातच महाराष्ट्र केसरी ठरला. त्याने अंतिल लढतीत मुंबईच्या विशाल बनकरला मात देत महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली.
शुक्रवारी वळवाच्या पावसाने तडाखा दिल्यानंतर शनिवारी सकाळी सेमी फायनल चे सामने झाले. यामध्ये माती गटात विशाल बनकर याने महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांना चितपट करून मुख्य स्पर्धेसाठी दावेदारी केली. तर पृथ्वीराज पाटील याने अक्षय शिंदे आणि हर्षल कोकाटे यांचा पराभव करत मुख्य स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला आहे.
पृथ्वीराज पाटीलने पुणे शहरच्या हर्षद कोकाटेवर एकतर्फी विजयाची नोंद केली, तर शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत विशालने वाशिमच्या सिकंदर शेखवर तेरा विरुद्ध दहा गुण फरकाने मात केली. पृथ्वीराज पाटील हा पन्हाळा तालुक्यातील देवठाणे गावाचा आहे. त्याचे शिक्षण १२ पर्यंत झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिंगणापूर येथील शाहु कुस्ती केंद्रातून त्याने सुरुवात केली. त्यानंतर लष्करात भरती झाल्यावर तिथेच त्याचे प्रशिक्षण सुरु झाले. त्याने आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदके मिळविली आहेत. रशियातील २०२१ ची जागतिक ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धेत कास्यपदक, सिनिअर नॅशनल चॅम्पियन २०२० स्पर्धेत रौप्यपदक, नॅशनल ज्युनिअर कुस्ती स्पर्धा २०२१ स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळविले आहे.