सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील सावरदरे ता. भोर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराष्ट्र दिनी रविवार दि- १ रोजी राष्ट्रध्वजाह वंदन करून राष्ट्रध्वज फडकवला होता. मात्र या शाळेतील बेफिकीर शिक्षकांनी सायंकाळी ५ वाजता राष्ट्रध्वज सन्मान पूर्वक न उतरवल्याने राष्ट्रध्वज दोन दिवस फडकवत ठेवला. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्या प्रकरणी मुख्याध्यापक व तीन शिक्षक यांच्याविरुद्ध राजगड पोलिसात निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक नितीन खामगळ यांनी गुन्हा नोंदविला आहे.
१ मे महाराष्ट्र दिनी सावरदरे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये फडकविलेला राष्ट्रध्वज शिक्षक संजय पापळ ,प्रवीण नांदे, शीतल टापरे, अहमद पटेल यांनी बेफिकिरीने वागून दोन दिवस राष्ट्रध्वज उतरवला नसल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली.त्वरित राजगड पोलिसांनी मंगळवार दि- ३ रोजी दुपारी ३.३० वाजता सन्मानपूर्वक राष्ट्रध्वज खाली घेतला. बेशिस्त शिक्षकांना ग्रामस्थांनी फोन केल्यावरच जाग आली.दरम्यान राष्ट्रध्वजाचा केलेल्या या अपमानाबद्दल बेशिस्त शिक्षकांना कायमस्वरूपी बडतर्फ करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
--------------
कडक कारवाई करणार
सावरदरे शाळेतील बेशिस्त शिक्षकांवर गुन्हा दाखल झालेला आहे.या शाळेतील मुख्याध्यापक व ३ शिक्षक यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केला आहे. लवकरच या चौघांवर कडक कारवाई करणार असल्याचे गतशिक्षण अधिकारी अश्विनी सोनवणे यांनी सांगितले.