सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
उंडवडी : प्रतिनिधी
कऱ्हा वागज (ता. बारामती) येथील 'यशोदीप निवासी मूकबधिर मुलांचे निवासी विद्यालय' या शाळेने लोणावळा येथे झालेल्या नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. याशिवाय अन्य दोन वैयक्तीक बक्षिसेही प्राप्त केली.
लोणावळा येथे खिरीड सामाजिक संस्थेच्या वतीने विशेष मुलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. जवळपास विशेष मुलांच्या वीस शाळा यामध्ये सहभागी झाल्या होत्या. नृत्य स्पर्धेत :यशोदीप'च्या चौदा मुलांच्या संघाने 'नका लावू बालमजुरी' हा संवेदनशील विषय घेऊन नृत्य कलाविष्कार सदर केला. हातात बालमजुरी विरोधी फलक घेऊन, मुलांना खेळू द्या. त्यांना कामाला जुंपून बालपण हिरावून घेऊ नका असा संदेश दिला. सदर मूक अभिव्यक्ती पाहून उपस्थित लोकांचे डोळे पाणावले. दरम्यान, फॅशन शो स्पर्धेत शाश्वत सावंत याने प्रथम तर लावणी नृत्य स्पर्धेत अश्विनी संजय जाधव हिने उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. अक्षय खिरीड यांच्या हस्ते पारितोषिक वितरण पार पडले. मुख्याध्यापिका रामेश्वरी जाधव, नृत्य दिग्दर्शक शिवाजी चव्हाण व अश्विनी भोसले यांनी मार्गदर्शन केले.