सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाकी(ता. बारामती) ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व तलाठी कार्यालयात येत नसल्याने गावातील विकासकांमांना खीळ बसली आहे. दोन्हीही महत्वाचे अधिकारी वारंवार गैरहजर राहत असल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या बोर्डवर ग्रामसेवक व तलाठी दाखवा एक हजार रुपये मिळवा असा संदेश लिहीत प्रशासनाचा नाकर्तेपणा उघडा केला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरु असून अधिकारी कार्यालयात येत नसल्याने विविध दाखले, कर्ज प्रकरणे, विकासकामे रखडली असून निधी मिळूनही अनेक विकासकामे अर्ध्यावरच पडून आहेत.
अधिकारी कधी येतात आणि जातात याबद्दल खुद्द ग्रामस्थांना आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनाच माहिती नसते. चोपडज, वाकी आणि कानाडवाडी या महसुली गावासाठी एकच तलाठी आहे. विविध शासकीय कामासाठी ग्रामस्थांना दाखले लागतात. याशिवाय शेतकऱ्यांना जमिनीचे सातबारा, आठ अ आणि अन्य नोंदणीची कागदपत्रे लागतात ही कागदपत्रे तलाठी यांना देण्याचे अधिकार आहेत मात्र ते वेळेत येत नसल्याने ग्रामस्थांची अडवणूक होत आहे. वरिष्ठ पातळीवरही याची दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांना वेठीस धरण्याचे काम अधिकाऱ्यांकडून सुरू असल्याचा आरोप माजी सरपंच हनुमंत गाडेकर यांनी केला आहे.