जावली ! जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर रोहित बनला प्रथम श्रेणी अधिकारी : गुणवत्ता यादीत २४ वा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----   
जावली : धनंजय गोरे
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2020 च्या परीक्षांची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये पवारवाडी (ता. जावली) येथील रोहित संदीप वारागडे याने 24 वा रँक मिळवत उज्वल यश मिळवले आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर रोहितने कोणताही खासगी क्लास न लावता मिळवलेल्या या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. दरम्यान, 13 एप्रिलला रोहितची जलसंपदा विभागातील वर्ग 2 ची सहाय्यक अभियंता पदावर निवड झाल्यानंतर अवघ्या दिड महिन्यातच बांधकाम विभागातील वर्ग 1 च्या अधिकारी पदावर त्याने मोहर उमटवली आहे.  

रोहितचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण साताऱयातील अण्णासाहेब कल्याणी शाळेत झाले. तर उच्च माध्यमिक शिक्षण यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमध्ये झाले. यानंतर अभियांत्रिकी पदवी शिक्षण नागपूर व्हीएनआयटीमध्ये झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोहितने एल. ऍण्ड टी. मध्ये नोकरी केली. परंतु एमपीएससीमधून  अधिकारी व्हायचे त्याचे स्वप्न त्याला झोपू देत नव्हते. 2019 मध्ये झालेल्या वर्ग 2 च्या परीक्षामध्येही त्याने यश मिळवत जलसंपदामध्ये सहाय्यक अभियंता हे पद मिळवले. परंतु वर्ग 1 चा अधिकारी होण्यासाठी त्याची जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने अभ्यास सुरूच ठेवला. नुकताच 2020 च्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा निकाल लागला आणि रोहित वारागडेचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. महाराष्ट्रातून 24 वी रँक घेऊन रोहित उत्तीर्ण झाला. सध्या गुणवत्ता यादी जाहीर झाली असून याचा अधिकृत निकाल महिन्याभरात लागेल. रोहितची वर्णी बांधकाम विभागात लागणार आहे.  

वडील डॉ. संदीप वारागडे व आई उज्वला वारागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोणताही क्लास न लावता स्वयंअभ्यास करुन रोहितने मिळवलेले यश खरोखरच कौतुकास्पद आहे. या यशाबद्दल रोहितचे आई, वडील यांच्यासह वारागडे परिवार, पवारवाडी ग्रामस्थ, नातेवाईक तसेच मित्रपरिवारातर्फे अभिनंदन होत आहे.
To Top