सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
जून महिना निम्मा संपला तरी अतिपर्जन्यवृष्ठी होणाऱ्या भोर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरिपातील पेरण्या खोळंबल्या आहेत. यामुळे बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत असून बळीराजाची चिंता वाढली आहे.
तालुक्यात सर्वत्र गेल्या आठ दिवसांपासून उन्हाचा कहर सुरू असून उकाडा जाणवत आहे.तर घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत.तालुक्यात मे महिन्याच्या शेवटी एक अवकाळी पाऊस बरसला असला तरी हा पाऊस पूर्ण तालुकाभर पडला नसल्याने शेती कामे खोळंबली होती. मात्र त्यानंतर चार ते पाच दिवसात पुन्हा तालुक्यात सर्वत्र जेमतेम अवकाळी पाऊस बरसला यामुळे खरीप पेरणीपूर्व शेती कामे शेतकर्यांनी पूर्ण करून घेतली आहेत.सध्या बळीराजा पावसाची आतुरतेने वाट पाहत असून पाऊस बरसताच कडधान्य पेरण्या तसेच भाताचे तर्वे टाकण्यास सुरुवात होणार आहे.
मागील वर्षी पाऊस वेळेत (जूनच्या सुरुवातीला)झाल्याने पेरण्याही वेळ झाल्या होत्या.त्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यात पिकांचे खुरपणी सुरू होती.मात्र यंदा जून महिना निम्मा उलटला तरी पिकांच्या पेरण्या झाल्या नसल्याने शेतकरी पाउस पडेल की नाही या चिंतेत आहेत.तर पावसाने हुलकावणी दिल्यास शेतकऱ्यांचे जीवन कठीण होण्याची चिन्हे आहेत.