आषाढी वारी ! सासवडचा 'वाघ्या' कुत्रा संभाळतोय वारीची परंपरा : सासवड ते निंबुत अंतर सोहळ्याचे सर्व नियम पाळत केले पार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
संत सोपानकाका पालखी सोहळ्यात सासवड पासून एक वाघ्या (अर्थात वारकरी बांधवांनी दिलेले नाव)नावाचा कुत्रा पालखी सोहळ्याचे सर्व नियम पाळत चालत आहे. एका रेषेत चालणे, त्याचा कुणालाही उपद्रव नाही. दोन वेळा टाकलेले अन्न खातो. पण दिवसाभरात काही टाकले तर तो त्याला तोंडही लावत नाही. थोडक्यात काय तर वारीचे सर्व नियम पाळताना वाघ्या कुत्रा दिसत आहे. 
         पूर्वी भारतीय संस्कृतीत मानव पंचमहाभूतांची पूजा करीत असे.त्यातच त्याला समाधान वाटे.पुढे मानव बुद्धीजीवी असल्याने श्रद्धा विकसित होऊ लागली.देव ही संकल्पना मनात रुजू लागली.देवाबरोबर प्राणीमात्रांचा समावेश श्रद्धेत सुरु झाला.शंकराचा नंदी,सर्प श्री दत्तांची गाय,कुत्रा सरस्वतीचा मोर गणपतीचा उंदीर चांगदेवांचा वाघ अशा अनेक प्राण्यांची देवाशी सांगड घालण्यात आली.त्यातून एकच शिकवण होती की, प्राणीमात्रावर दया करावी.त्याची हत्या होऊ नये.अहिंसा हे तत्व समाजमनात रुजावे.त्याप्रमाणे सामाजिक वर्तन ही झाले.पुढे गौतम बुद्ध,भगवान महावीर यांनीही या तत्वाचा पुरस्कार करुन शिकवण दिली.तसतसा प्राणी मानवाचा मित्र झाला.मानवाने या मित्रत्वाचा फायदा त्याचा उपयोगीतेत करुन घेतला.विशेषतः शेतकऱ्यांने याचा फायदा करुन घेतला.तो मानवाच्या सान्निध्यात राहू लागला.मानवाशी प्रामाणिकपणा दाखवू लागला मानवाच्या भावना त्याला समजू लागल्या पण वाचेअभावी तो आजही व्यक्त करु शकत नाही हे त्याचे दुर्दैव...हे असंच काहीतरी ! आज संत सोपानकाकांचा पालखी सोहळा पंढरपूरांकडे मजलदरमजल करीत कूच करीत आहे.पालखीच्या मागेपुढे दिंड्या आहेत.भक्तीभाव समर्पित करीत वारकरी बांधव नामघोषात चालत आहेत पण त्यात एक विशेष बाब जाणवते एक कुत्रा या दिंड्याबरोबर चालताना दिसतो.त्याचा कुणालाही उपद्रव नाही.दोन वेळा टाकलेले अन्न खातो.अव्हेर नाही पण दिवसाभरात कांही टाकले तर तो त्याला तोंडही लावत नाही.थोडक्यात वारीची परंपरा संभाळत स्वाभिमानीपणा जपताना दिसतो.तशी दिंडीची शिस्तही पाळतो.दिंडीच्या तळावरच मुक्काम.गांव कुत्र्यांचा संपर्क नाही.भूंकणे नाही ओरडणे नाही.अंगभूत गुणांचे प्रदर्शन नाही.वारकऱ्यांच्या गर्दीतूनही शिस्तीने चालणे.त्याच्यासोबत फोटो घेण्यासाठी कांहीची लगबग असते.पण त्याला त्याचे सोयरसुतक नाही त्याला  शिस्तबद्ध मार्ग आक्रमणे हे त्याचे ध्येय...! तसा हा अनाहुत वारकरी पोटासाठी म्हणा अगर विठ्ठलांसाठी भक्तीभावाने निघालाय.कोण्या श्रद्धाळू भक्ताने त्याच्या गळ्यात झेंडुच्या फुलांचा हार घातलाय याचा त्याला ना खेद ना आनंद..पण दिंडी बरोबर चालणे त्या मुक्या जीवाने बांधिलकी मानलीय एवढे मात्र खरे..चालतानाही त्याचे तोंड खाली असते जणू माणसांना तो संदेश देतोय श्री विठ्ठलाकडे जाताना विनम्रतेने जावे.खरं तर आज विज्ञानाच्या युगात माणूस ओहर झालाय त्याला या अनाहुत वारकऱ्याची चपराक आहे खरंच आपण हे अनुसरावयास हवे मग आदर्श समाज का निर्माण होणार नाही.तो मूळातच प्रामाणिक आहे त्यात विनम्रता ही केवढी मोठी शिकवण.संत संप्रदायात  संत नामदेवांना कुत्र्यात देव दिसला त्याच्या पोटात दुखू नये म्हणून तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे धावणारे संत नामदेव आपण वाचलेत. देव शोधता आला पाहिजे पाहता आला पाहिजे ही दृष्टी अलिकडे कमी झालीय.या निमित्ताने आपण शोधकवृत्तीने अनुभवू या.देवत्वाचा शोध घेता घेता मानव्याचे सुराज्य निर्माण करुया.विघातक प्रवृत्तीला मूठमाती देऊया..मग आपल्या पूर्वजांनी दिलेला सदविचारांचा ठेवा आणि संस्कृतीचे जतन केल्याचे या सोपानकाका पालखी सोहळ्याने सार्थकी झाले असे म्हणता येईल पण...या मुक्या अनाहुत 'वाघ्या' वारकऱ्याला खरोखर सांष्टांग दंडवत..
------------------
एस.एस.गायकवाड 
लेखक : शिक्षक व सेवानिवृत्त प्राचार्य आहेत.
सर्व छायाचित्रे : रोहित जगताप - मुरूम
To Top