सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सासवड ते पंढरपूर जाणाऱ्या संत सोपानकाका पालखी सोहळ्याने पुरंदर तालुक्याची हद्द सोडत आज बारामती तालुक्यात प्रवेश केला. निंबुत ग्रामस्थांच्या स्वागतानंतर सोहळा मुक्कामासाठी निंबुत गावात विसावला.
दुपारची न्हारी उरकून या सोहळ्याने बारामतीच्या दिशेने प्रस्थान केले. सायंकाळी साडेचार वाजता सोहळा निंबुत येथे आल्यानंतर शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांच्या हस्ते रथाच्या बैलांचे पूजन करण्यात आले. यावेळी बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, सरपंच निर्मला काळे, उपसरपंच अमरसिंह काकडे, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप काकडे, सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक चंद्रशेखर काकडे, माजी सरपंच राजकुमार बनसोडे, सदस्य कुमावती काकडे, भीमराव बनसोडे, मदन काकडे, विजय काकडे, शशिकांत काकडे, सुमित काकडे, प्रदीप मांगडे, शिवाजी काकडे, सुजित काकडे यांच्यासह विस्तार अधिकारी डी डी खंडाळे, एस एस मारकड, वडगाव निंबाळकारच्या मंडळ अधिकारी प्रमिला लोखंडे, तलाठी बाबासाहेब आगाम, संजय खाडे, नंदा पुंदे, ग्रामसेवक पी के गाढवे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावात प्रवेश केल्यानंतर सोपानकाकांच्या पादुका दर्शनासाठी विठ्ठल मंदिरात ठेवण्यात आल्या होत्या. परिसरातील लक्ष्मीनगर, खंडोबाचीवाडी, गडदरवाडी, रासकर माळ, फरांदेनगर परिसरातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांची माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा तसेच ग्रामस्थांच्या घरोघरी राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली होती. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती तर बा सा काकडे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझमीच्या तालावर सोहळ्याचे स्वागत केले.
आजचा मुक्काम उरकून उद्या सायंकाळी हा सोहळा मुक्कामासाठी सोमेश्वर कारखाना स्थळावर विसावेल. तत्पूर्वी दुपारी वाजता काकडे महाविद्यालयाच्या मैदानात गोल रिंगण पार पडणार आहे.
---------------------
ग्रामस्थांकडून दोन लाखाचा धनादेश-----
संत सोपानकाका पालखी सोहळ्याला निंबुत ग्रामस्थांच्या वतीने दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे व ग्रामस्थ यांच्या वतीने हा धनादेश पालखी सोहळा प्रमुख यांचेकडे सुपूर्त करण्यात आला.