शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी टनाला ३५० रुपये देण्याबाबत सोमेश्वर कारखान्याला दिली ही शेवटची तारीख

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२१-२२ या गळीत हंगामातील खोडकी बील १५०/- रू. प्रति मे.टन व दुसरे बील २००/- रू प्रति मे. टन असे एकुण ३५० /- रू ३० जुन पर्यंत सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावे. अशी मागणी पुणे जिल्हा शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतिशराव काकडे यांनी केली आहे. 
          आज शेतकरी सभासदांना शेतीच्या मशागतीची, लागवडीची कामे, मुलांचे शिक्षणाची प्रवेश फी इत्यादीसाठी पैशांची आवश्यकता आहे. यासाठी कारखान्याने खोडकी बील १५०/- रू. प्रति मे.टन व दुसरे बील २०० /- रू. प्रति मे.टन असे एकुण ३५०/- रू. प्रति मे.टन सभासदांच्या बँक खात्यावर त्वरीत वर्ग करावे. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात कारखान्याने १३ लाख २५ हजार ३९५ मे.टन ऐवढे उच्चांकी गाळप करून १५ लाख ५४ हजार ६२५ साखर पोत्यांचे उत्पादन झालेले आहे. कारखान्याचा साखरेचा उतारा (रिकव्हरी) ११.७३ ही सुध्दा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे. तसेच विज निर्मिती, अल्कोहल, इथेनॉल यांचे उत्पादनसुध्दा चांगले झाले असुन त्याचे रोख पैसे कारखान्यास मिळालेले आहेत. असे असताना कारखान्याच्या संचालक मंडळाने सभासदांना ३५० /- रू. प्रती मे. टन खोडकी बील व दुसरा हप्ता देण्यास काहीच अडचण नाही.
        चालू गळीत हंगामामध्ये चेअरमन व M.D यांच्या चुकीच्या नियोजनामुळे गाळपास उशिर झाल्याने काही सभासदांचा उस १९ ते २१ महिने शेतातच उभा असल्याने सभासदांना उस पेटवुन गाळपास द्यावा लागला. त्यामुळे कारण नसताना त्यांच्या उस बिलातून ८०० रू प्र.मे. टन कपात करण्यात आली की जे अन्यायकारक होते. जळीत उसा संबंधी चेअरमन यांनी स्वतःचा खाजगी कारखाना असल्यासारखा निर्णय घेतलेला दिसतो. निदान M.D यांनी तरी ही बाब संचालक मंडळाच्या निदर्शनास आणुन देणे गरजेचे होते. परंतु त्यांनी तसे केले नाही. ते चेअरमन यांच्या मनमानी कारभाराला पाठींबाच देत आहेत असे दिसते. तसेच सभासदांच्या तोडी लांबल्याने उस वजनामध्ये १० ते १ १५ टनांची घट झाली, त्यातही सभासदांचेच नुकसान झाले कारखान्याचे नाही. तसेच उस तोडीसाठी मार्च ते मे महिना उजाडल्याने उस तोडणी मजुरांनी सभासदांकडुन उस तोडणीसाठी एकरी ५ ते २५ हजार रू. घेवून ९० टक्के उस पेटवुनच कारखान्यास पाठवला. त्यामुळे सभासदांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याची जाण ठेवुन चेअरमन व संचालक मंडळ यांनी तात्काळ मिटींग बोलावुन ज्या
          सभासदांचे ८०० रू प्रति मे.टन कपात केलेले आहेत ते परत देण्याचा ठराव करावा तसेच खोडकी बील १५०/- रू व दुसरे बील २००/- रू प्रति मे.टन असे एकुण ३५०/- देणे बाबतही तात्काळ ठराव करून ३० जुन २०२२ पर्यंत सभासदांच्या बँक खात्यावर खोडकी बीलाचे १५० व दुसरा हप्ता २००/- रू. असे एकुण ३५०/- प्रती मे.टन तात्काळ जमा करावे, अशी मागणी शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
            तसेच चेअरमन यांनी यापुढे तरी फक्त न फक्त कारखाना कसा चांगला चालेल व सभासदांना जास्तीत जास्त न्याय कसा देता येईल एवढेच पहावे. स्वतःचे गाव सोडुन इतर कोणत्याही गावात नाक खुपसु नये कारण अजितदादांनी अपणास फक्त कारखाना पहावयास सांगितले आहे इतर गावात लक्ष घालण्यास नाही. असे आवाहन शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
To Top