सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती : प्रतिनिधी
होळ (ता. बारामती) च्या ग्रामपंचायत सदस्यांना उपसरपंच पदात स्वारस्य राहिले नसून प्रत्येकालाच सरपंच हवे असल्याने उपसरपंच रिक्त राहिले आहे. होळच्या विद्यमान उपसरपंच यांनी पंधरा दिवसांपूर्वी ठरलेल्या वेळेनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर मंगळवारी(दि.३१) रोजी ग्रामपंचायत कार्यालयात नविन उपसरपंच पदासाठी सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र यात उपसरपंच पदासाठी कोणीही रस दाखवला नाही.या पदासाठी एकही अर्ज आला नसल्याने बैठक तहकूब करावी लागली. याबाबत उलटसुलट चर्चा होळ, वडगाव, सोमेश्वर परीसरात सुरू असून १० सदस्यांना पाच वर्षात सरपंचपद कसे मिळणार असा सवाल यानिमित्ताने ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
जानेवारी २०२१ मध्ये होळ ग्रामपंचायतची निवडणुक झाली. यात एकाच गटाचे १० उमेदवार निवडून आले. पाच वर्ष पाच सरपंच आणि पाच वर्ष पाच उपसरपंच असा निर्णय सुरवातीला घेण्यात आला. यानंतर एका वर्षाच्या कालावधीनंतर नुकतीच नविन सरपंच निवड पार पडली. मात्र दुसऱ्यांदा उपसरपंच पदासाठी कोणीही सदस्य इच्छुक नसल्याने हे पद सध्या रिक्त राहिले आहे. विरोधी गटाचा एकच सदस्य असल्याने त्या सदस्याला सूचक मिळणार नसल्याने त्याही सदस्याने पदासाठी अर्ज दाखल केला नाही. वर्षभरासाठी सरपंच पद असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार कळण्या अगोदरच पदापासून दूर व्हावे लागत आहे. बारामती तालुक्यात बहुतांश सर्वच गावात एकाच वर्षासाठी सरपंचपद आणि उपसरपंच पद दिले जात असल्याने ग्रामपंचायतीची विकास कसा होणार असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार ग्रामपंचायतीसाठी करोडो रुपयांचा विकासनिधी देत असून या निधीचा अपव्यय आणि विकासकामे दर्जेदार होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
COMMENTS