सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाडी (ता. बारामती) येथील निरा- बारामती रस्त्याचे रुंदीकरणाचे काम महिनाभरापासून रखडले आहे. संत सोपानदेव पालखी सोहळा तोंडावर असताना रस्त्याचे काम रखडल्याने सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना तसेच दररोज या मार्गाने प्रवास करणारे वाहनचालक यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एखादा अपघात झाल्यानंतरच येथील रस्त्याच्या साईटपट्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणार का असा वाघळवाडीकर विचारत आहेत.
जिल्हा परिषद शाळा ते अक्षय गार्डन दरम्यान रस्त्याच्या साईटपट्या भरण्याचे काम सुरु आहे. ठिकठिकाणी रस्ता उकरून ठेवला असून याठिकाणी खडी पसरून ठेवली आहे. वाहने जाणाऱ्या बाजूला बॅरीकेट्स नसल्याने रात्रीच्या वेळी दिसत नाही पर्यायाने नविन वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. दीड किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्याच्या साईटपट्या भरण्यासाठी एक महिना होऊनही काम पूर्ण होण्यास अजून किती वेळ जाणार याबाबतीत मात्र शाशंकता व्यक्त होत आहे. ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे रस्त्याचे काम रखडले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून पालखी सोहळा येण्यापूर्वीच रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
निरा- बारामती रस्ता अगोदरच समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. अनेक कामांची देखभाल- दुरुस्ती होणे अपेक्षित असताना ती झालेली नाही. संत सोपानदेव पालखी सोहळा २५ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. २७ जूनला निंबुत आणि २८ ला पालखी सोमेश्वरनगर येथे मुक्कामी येणार आहे. या अगोदर येथील साईटपट्यांची कामे पूर्ण करावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.