सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा : प्रतिनिधी
मागील आठवड्यापासून, वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असून, हे वातावरण आरोग्यासाठी अपायकारक ठरत आहे. तसेच नुकताच संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी सोहळा परिसरातून गेल्यामुळे व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
दरम्यान, नीरा परिसरात उन्हाळ्यासारखे कडक ऊन पडत असून, मध्येच कधीतरी अधूनमधून पावसाची रिमझिम धारा यामुळे दिवसभर गरमाई तर सायंकाळी थंडगार वारा यामुळे नीरा आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या वाढली आहे. गवत, चिखलामुळे, डासांचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी साथीच्या आजाराने सर्वत्र हात पाय पसरले असून, डेंगू , चिकनगुन्या, झिंका सारखे आजार होण्याची भीती निर्माण होत असून, सध्या घरटी एकातरी रुग्णास सर्दी किंवा तापाची लक्षणे आढळून येत आहेत. नीरा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत गावात आता कोरोनाचे ३ रुग्ण आहेत. नीरा शहर, थोपटेवाडी, गुळुंचे प्रत्येकी एअ रुग्ण कोरोना बाधित असल्याची माहिती नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. समिक्षा कांबळे यांनी दिली आहे.
नीरा परिसरातील गुळुंचे, कर्नलवाडी, पिंपरे (खुर्द), थोपटेवाडी, जेऊर, पिसुर्टी आदि गावामध्ये मोठ्या प्रमाणावर थंडी, ताप, सर्दी, खोकला आदी आजारांच्या रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व खासगी रुग्णालयांच्या दारामध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा नीरा व परिसरात येण्या आधी नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओपीडी रूग्ण संख्या २० ते २५ आसपास होती. तसेच खाजगी रुग्णालयातीलही ३० ते ४० च्या दरम्यान होती. मात्र पालखी सोहळा पुढे मार्गस्थ होताच मंगळवार (दि.२८) प्राथमिक आरोग्य केंद्रातील व खाजगी रुग्णालयातील रूग्ण संख्या वाढीस सुरूवात झाली. परिसरातील खाजगी रुग्णालयातील ओपीडी रूग्ण संख्येतही लक्षणीय वाढ होत असून, मागील आठवडय़ात ३० ते ४० रूग्ण संख्या होत असलेल्या रूग्णालय दिवसभर ८० - ८५ होत असल्याची माहिती डॉ. शेखर रणनवरे यांनी दिली.
---------------------
नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवार दि.२९ ओपीडी रूग्ण संख्या ४०, गुरूवार दि.३० ओपीडी रूग्ण संख्या ५९, शुक्रवार दि.१ ओपीडी रूग्णसंख्या १४५, शनिवार दि. २ ओपीडी रूग्ण संख्या २०, सोमवार दि.०४ ओपीडी रूग्णसंख्या १०९ अशी असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक बाप्पुसाहेब भंडलकर यांनी दिली.
----------------
"पालखी सोहळ्यानंतर तसेच मोसमी पाऊस सुरु झाल्यावर वातावरणात बदल होत असतो. हे वातावरण आपल्या शरिराला साथ देत नसते, तसेच पावसात भिजल्यावर कणकणी, ताप, सर्दी खोकला येऊ शक्तो. या सर्व आजारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्यती व मुबलक औषधांचा साठा असून, रुग्णांनी इतरत्र इलाज करुन घेण्या ऐवजी नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासून औषधोपचार करुन घ्यावा."
डॉ. समिक्षा कांबळे
आरोग्य अधिकारी नीरा प्राथमिक आरोग्य केंद्र
---------------------
"पालखीनंतर नीरा ग्रामपंचायतीने गावातील तसेच पालखी महामार्ग परिसरातील व पालखी मैदानातील कचरा उचलून तो नष्ट केला असून, वारकऱ्यांनी शिल्लक अन्न उघड्यावर ओतले होते. त्या अन्नवरही औषध टाकले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने मोठ्या प्रमाणावरती स्वच्छता केली होती; तसेच डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धूर फावारणी करण्यात येत आहे."
तेजश्री काकडे - सरपंच नीरा.