बालपणीचा बेंदूर सण...... ! लेखक एस एस गायकवाड : खरचं तो बेंदूर पुन्हा अनुभवायला येईल का ?

Admin
टीम सोमेश्वर रिपोर्टर-------
नुकत्याच शाळा भरलेल्या असायच्या.ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा ही होऊन गेलेला असायचा.नवी पुस्तकं,वह्या,शाईची दौत,टाक,निप सारं कांही मनासारखं.त्यात गुरुजींनी चालीवर शिकवलेली कविता...मन प्रसन्न असायचं.आणि एक दिवस आई कुळताईच्या माळाला जायची.पांढरीची माती घमेलं भरुन आणायची.सोनार मळ्यातून सर्जूनाना तथा सर्जेराव निगडे यांच्या मळ्यातून शेणाची पाटी आणायची.चुलीचा,भानवसीचा पांढऱ्या मातीने पोतेरा व्हायचा.पांढरीच्या मातीचा खमंग गंध घरभर सुटायचा असं वाटायचं ती मातीच खावी.नंतर शेणानं भुईसारा व्हायचा.सारवलेल्या जागेवरुन चालायच नाही ही ताकिद.नंतर सर्व वाळायचं.त्या रात्री झोपी जायचय.सकाळी उठलेलो असायचो तेव्हा   चुलीला हळदीकुंकवाचे टिपके लावलेलं असायचं.तसंच घरांच्या चौकटीला ही..ढणढणत्या चुलीवर पाणी तापायचं.त्यावेळी गावांतील गाई बैलं निरा डाव्या कालव्याकडे कळपाने निघालेली असायची‌.तरुण शेतकरी उत्साहाने हाकाटी करत धुळ उडवत निर्मळ पाण्याने गुरांच्या अंघोळी उरकत.आणि दावणीच्या परतीच्या प्रवासाने माघारी फिरत.आम्ही कुंभारवाड्यात जाऊन मातीची बैलं नाचववत घरांकडं यायचो.कुंभारवाड्यात हिडीसफिडीस नसे.मोठ्या कौतुकाने बैल हाती ठेवत.सदैव ताठ शिंगे व ताठच पाय असलेले..पण बालमनाला ते क्षणभर भुरळ घालत.बरोबरचे सवंगडी आपल्या आपल्या घरी जात.सणाच्या अंघोळी उरकल्या जात.ढणढणत्या चुलीवर हरबऱ्याची डाळ शिजायला टाकली जाई.नित्यापेक्षा अवेळी पेटलेली चूल नटल्यासारखी वाटे.आईची लगबग तर फारच उत्साही आणि आनंदमय असायची.पुरणाचा गोड वास घर भरुन राहायचा पण तो बालमनाला अस्वस्थ करुन जायचा.सुंठ, वेलदोडे,आमटीच्या फोडणीच्या वासाने बालपणीची लाळ ओघळलेली कळायची नाही.उगीचच आईच्या भोवती घुटमाळायचं पण देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय खायचं नाही असा दंडक तरी सुद्धा वेड्या मायेने गोड पुरणाचा मुटका हातात मिळे.मग अंगण ही थिटे पडे.प्रत्येकाच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक चाललेला असे.गोड आणि खमंग वासाने सर्वत्र वातावरण भरलेलं असे.उगीचच एकमेकांच्या घरात डोकावून धुम ठोकायची.मनात आणि बाहेर आनंद भरलेला असायचा.उगीचच वाजंत्र्यासारखा गांवाला फेरफटका मारण्यात आनंद वाटायचा.दमलेल्या पायचं भान ही नसायच.होई होई तो दिवस कललेला असायचा तो ही ढगाआड दमल्या सारखा वाटायचा.आईचं उरकायचं तसं ती देव्हाऱ्याकडे जायची.पूजा व्हायची.कुंभारवाड्यातून आणलेली बैलं देवापुढे मांडून त्यांची पूजा व्हायची.समोर नैवद्य मांडला जाई.उदबत्तीच्या वासाने   प्रसन्नमय वातावरणात भर पडे.आई देवाच्या पाया पडायला सांगे.मोठ्यांचे अनुकरण करुन डोळे मिटून पाया पडले जाई.देवाला काय मागायचे माहीत नसे.बैलांनी आणि देवांने नैवद्य खावा असे बालमनाला वाटे.पण ते शक्य नसे.आम्ही कदाचित देवापुढील दाखवलेला नैवद्य खाऊ म्हणून आई तात्काळ आम्हाला कांही तरी काम सांगे.लक्ष विचलित व्हावे हा उद्देश.. तोपर्यंत बाहेर अंधार पडलेला असे.गावातून सजविलेल्या बैलांची मिरवणूक निघालेली असे.महादनानांचा ढोल,रामोशी समाजातील खेळगडी मोठ्या आनंदाने तालात रमून गेलेले असतं.ज्याच्या ज्याच्या दारात मिरवणूक येई तेथे स्त्रिया बैलांना ओवाळत.त्यांच्या पायावर पाणी ओतत.मनोभावे पाया पडत.अंधारात ही हे चैतन्यमय दृश्य मनाला सुखावून जाई.मिरवणूक श्री‌.जोतिर्लिंगांच्या मंदिराकडे सरकू लागे.वाद्यांचा आवाज मात्र मनात रुंजी घालून जाई.प्रत्येकाची पावलं घराकडं वळतं.दिव्याच्या मिणमिणत्या उजेडात घरात पुरणपोळीची अंगतपंगत रंगे.जेवताना गोड घासाचा आग्रह होई.पुरणपोळीच्या गोड चव जिभेवर तरंगत राही.भिंतीला टेकून तसचं कलंडला जाई.त्यावेळी स्वप्नांत मातीच्या बैलांची झुंज लागलेली दिसे.त्यामुळे मन अस्वस्थ होई.. त्यावेळी आईची हाक कानावर येई.स्वप्न भंगलेलं असे.मात्र बेंदूर सण हा निबंध लिहिण्यासाठी दौतीत टाक बुडवलेला असे.सुंदर अक्षरांतील बालमनाला भावलेला बेंदूर सणाचा निबंध तयार झालेला असे.शाळेच्या ओढीने आणि गुरुजींच्या धाकाने.... गुरुजींच्या शाब्बासकीने ओंथबलेला तो निबंध सायंकाळी ढणढणत्या चुलीपुढे वाचून दाखवला जाई..दुसऱ्या कौतुकाच्या लडवाळ शब्बासकीसाठी...खरचं तो बेंदूर पुन्हा अनुभवायला येईल का या विचाराने आज मन उगीचच अस्वस्थ होते एवढं मात्र खरं....        
--- ------ - 
श्री.एस.एस.तथा संभाजी सिताराम गायकवाड सर मो.नं.7768098296
लेखक - सेवानिवृत्त उपप्राचार्य आहेत. 
To Top