शिरवळ बिग ब्रेकिंग ! शिरवळ येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या प्रवाशांना लक्झरी बसने उडवले ....! चौघे जखमी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
खंडाळा : प्रतिनिधी-
शिरवळ ता.खंडाळा येथील पुना थांब्यावर साताऱ्याहून पुणे बाजूकडे निघालेल्या खाजगी लक्झरी बसने वाहनांची वाट बघत असलेल्या ४ प्रवाश्यांना जोरदार धडक देत गंभीर जखमी केले आहे.
      याबाबतची शिरवळ पोलीसांनी व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, कवठे ता.खंडाळा येथील एका खाजगी कंपनीमध्ये मुलाखतीसाठी आलेल्या चिखली जि.बुलढाणा येथील मयूर रविंद्र रावे (वय २३) हा कंपनीमधील मुलाखत संपवून पुणे याठिकाणी जाण्याकरिता खाजगी कंपनीमधील अधिकारी रणजित राजाराम कुंभार (वय३२,रा.सातारा) यांच्यासमवेत शिरवळ ता.खंडाळा गावच्या हद्दीमधील महामार्गावर पुना थांब्यावर वाहनांची प्रतीक्षा करीत होता. दरम्यान,कर्नाटकाहून पुणे बाजूकडे निघालेल्या भरधाव वेगाने निघालेल्या ओरेग ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी बस (क्रं.एआर-०२-ए-९६९१) चा चालक गुरुराज तमन्ना कुलकर्णी (वय२६,रा.फत्तेपुर ता.ताळीकोट जि.विजयपूर राज्य-कर्नाटक) याने अचानकपणे महामार्गावर रस्त्यावर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांना गतिरोधक असल्याचे समजत बसचा अचानकपणे ब्रेक मारल्याने लक्झरी बसवरील चालक गुरुराज कुलकर्णी याचे नियंत्रण सुटत बस अचानकपणे महामार्गावर फिरत वाहनांची प्रतीक्षा करीत असलेल्या मयूर रावे, रणजित कुंभार,पुणे याठिकाणी निघालेल्या निकिता दत्तात्रय जाधव (वय २३,रा.अतिट ता.खंडाळा) व  सुंदर सुरेश मोदी (वय २८,रा. शिरवळ ता.खंडाळा) यांना जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये महामार्गावर वाहनाची वाट बघत असलेले चारही प्रवाशी गंभीर जखमी झाले. यावेळी अपघाताची माहिती मिळताच शिरवळ पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत युवकांच्या मदतीने गंभीर जखमी झालेल्या प्रवाश्यांना तत्काळ शिरवळ येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले.
  याबाबतची मयूर रावे याने शिरवळ पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस अंमलदार अरुण भिसे-पाटणकर हे करीत आहे.
To Top