बारामती ! कऱ्हावागज, लोणी भापकर गावांमधून अवैद्यरित्या कोळशाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर वनविभागाची कारवाई

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----  
मोरगाव : प्रतिनिधी
बारामती तालुका वनपरीक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कऱ्हावागज व लोणी भाकर या गावांमध्ये लाकडांपासून  अवैधरीत्या कोळसा बनवण्याच्या भट्ट्या चोरीच्या मार्गाने सुरू आहेत. या भट्ट्यांमधून मालवाहतूक गाडीने कोळसा घेऊन जाणारा टेम्पो पकडून त्यावर वन अधिनियम 1927 नुसार गुन्हा दाखल करून वाहन जप्त केले  असल्याची माहिती बारामती तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांनी दिली.
         तालुका वनपरीक्षेत्र अंतर्गत  येणाऱ्या  कऱ्हावागज येथील वन क्षेत्रामध्ये वनपाल बारामती तसेच वनरक्षक बारामती गस्त घालत असताना खाजगी जमिनीमध्ये प्रोसोपीस प्रजाती पासून तयार करण्यात आलेला कोळसा  टेम्पोत  भरत असताना आढळून आला . हा मुद्देमाल जागेवर पकडून संबंधित वाहनचलकावर कोळसा वाहतुकीसाठी लागणारा परवाना नसल्याचे आढळून आले. त्यांच्यावर वन अधिनियम 1927 महाराष्ट्र वन नियमावली 2014 नुसार गुन्हा नोंदवला आहे. तसेच लोणी भापकर तालुका बारामती  येथील वनक्षेत्र अंतर्गत असणाऱ्या खाजगी जमिनीमध्ये विनापरवाना कोळसा  भट्टी लावून कोळसा तयार करत असणाऱ्या भट्ट्यांवर वनरक्षक मोरगाव यांनी भारतीय वन अधिनियम 1927 तसेच महाराष्ट्र वन नियमावली 2014 गुन्हा नोंदवला आहे.सदर गुन्ह्याबाबत वन विभागाने सदर आरोपीस  दंडात्मक कारवाई केली.
          सदरची कार्यवाही राहुल पाटील उपवनसंरक्षक पुणे, मयूर बोठे सहाय्यक वनसंरक्षक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर , वनपाल हेमंत मोरे,  अमोल पाचपुते,  वनरक्षक बाळासो लांडे, वनसेवक  प्रकाश लोंढे यांनी केली. बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात अशा अनेक भट्ट चालू असून या अवैध भट्ट्या बाबत शेतकऱ्यांनी अथवा ग्रामस्थांनी बारामती  वनपरिक्षेत्राशी संपर्क केल्यास या अवैध भट्ट्यांवर व कोळसा वाहतुकींवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती बारामती तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांनी 'सोमेश्वर रिपोर्टर'शी बोलताना दिले
To Top