सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिंदे गटाकडून शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरही दावा केला जाण्याची शक्यता आहे. याची पूर्ण कल्पना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही आहे. आता तर कायदेशीर लढाईत आपल्याकडून पक्ष चिन्ह हिरावलं जाऊ शकतं याचीही तयारी उद्धव ठाकरेंनी केलेली दिसत आहे. कारण शिवसेनेत एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक चिन्हाबाबत सूचक विधान केलं आहे.
कायदेशीर लढाईत धनुष्यबाण हे चिन्ह गमावावं लागल्यास नव्या चिन्हासाठी तयार राहा आणि नवं चिन्ह घरोघरी कसं पोहोचेल याची काळजी घ्या, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दिपक केसरकर यांनी अजूनही वेळ गेलेली नाही आमची उद्धव ठाकरेंना विनवणी आहे की त्यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी आणि सुवर्णमध्य काढावा, असं म्हटलं आहे.