सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जावली : प्रतिनिधी(धनंजय गोरे)
आषाढी एकादशीनिमित्त प्रतीपंढरपुर करहर येथील विठ्ठल मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक त्या खबरदारी घेऊन प्रशासनाने भाविकांना सर्व सुविधा पुरवाव्यात, अशा सूचना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्या.
प्रतिपंढरपूर करहर (ता. जावली) येथे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या नियोजन आढावा बैठकित आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार राजेंद्र पोळ, माजी उपसभापती हणमंत पार्टे, पिंपळीचे माजी सरपंच प्रमोद शिंदे, वालुथचे सरपंच समाधान पोफळे, काटवलीचे सरपंच हणमंत बेलोशे, जावली बँकेचे माजी संचालक विनोद कळंबे, नितीन गावडे, अरुण यादव (गुरुजी), पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रमेश काळे, सहायक पोलीस निरीक्षक श्री.अमोल माने, पाणीपुरवठ्याचे श्री साठे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे पवार, उपविभागीय अभियंता इनामदार यांच्यासह वारकरी संप्रदायातील पोपट आप्पा रांजणे, संतोष बेलोषे बापू गोळे , गणपत बेलोशे तसेच विविध गावचे सरपंच, भजन मंडळांचे पदाधिकारी व सदस्य पदाधिकारी आणि सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
बैठकीत भाविकांसाठी आरोग्यसेवा, स्वच्छता याबाबत सविस्तर चर्चा झाली. पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे तसेच पावसामुळे चिखल होत असल्याने रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्ट्यांवर मुरूम टाकणे आदी निर्णय घेण्यात आले. प्रशासनातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष ठेवून आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. करहर येथे येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, याची खबरदारी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.