सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
वरवे खुर्द ता. भोर तेथील लघु पाटबंधारे तलावात सोमवार दि.२५ सकाळी पोहण्यासाठी गेलेल्या महसुल कर्मचारी(तलाठी) यांचा पोहताना दमछाक झाल्याने बुडाल्याची घटना घडली. मुकुंद त्रिंबक चिरके वय-३५ रा. नसरापूर मुळगाव माजलगाव, जि. बीड असे बुडालेल्या तलाठ्याचे नाव असुन चीरके हे भोर तहसीलदार कार्यालयात दाखला कारकुन म्हणून कार्यरत होते.
चिरके त्यांच्या मित्रांसमवेत रोज वरवे खुर्द येथील तलावात पोहण्यासाठी जात होते.नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी सात वाजता दोन मित्रांसमवेत ते पोहण्यासाठी गेले असताना.मी पोहत पलीकडच्या किनाऱ्यावर जावून येतो असे म्हणून पाण्यात पोहत गेले परंतु पाण्याच्या अंदाज न आल्याने मध्यभागी गेल्यावर त्यांची दमछाक झाली.त्यांनी हात वर करुन आपल्या मित्रांना मदतीसाठी आवाज दिल्यावर मित्रांनी तातडीने किनाऱ्यावरील साधी वल्हवण्याची बोट घेऊन तिथे जाण्याचा प्रयत्न केला.दरम्यान त्यांच्यापर्यंत पोहचण्या अगोदरच ते बुडाले होते असे मित्रांकडून सांगण्यात आले.परिसरातील स्थानिक तरूणांनी देखील त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला मात्र पाणी खोल असल्याने ते बुडाले.भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे व तहसीलदार सचिन पाटील, मंडल अधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली, विद्या गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जोशी, सहायक फौजदार उमेश जगताप व महसूल कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.तर भोर येथील भोईराज जल आपत्ती निवारण पथकाच्या वतीने पाण्यात शोध घेतला असता तीन तासानंतर त्यांचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला.