बारामती ! संशोधन हे समाजाचे श्रम व त्रास कमी करते : डॉ संतोष भोसले : सोमेश्वरनगर येथे विज्ञान-तंत्रज्ञान प्रदर्शन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
संशोधन करताना प्रचंड चिकित्सा, पडताळणी, प्रयोग करावे लागतात. त्यामुळे अपयश हे येतेच. पण अपय़शाने खचून न जाता अविरत काम करत रहावे. संशोधन हे समाजाचे श्रम, त्रास कमी करते. कमीत कमी साधनांमध्ये अधिकाधिक लोकपयोगी संशोधनावर भर द्यावा, असे मत 'मेंटर्स फाऊंडेशन'चे अध्यक्ष डॉ. संतोष भोसले यांनी केले.
येथील सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या शऱदचंद्रजी ग्रुप ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'सोमेश्वर टेक्नोथॉन' या विज्ञान-तंत्रज्ञान प्रदर्शनाचे व स्पर्धेचे उद्घाटन डॉ. भोसले यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप होते. याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, गटविकास अधिकारी अनिल बागुल,  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, गटशिक्षणाधिकारी संपत गावडे, लक्ष्मण गोफणे, प्रणिता खोमणे, संग्राम सोरटे, अभिजित काकडे, ऋषी गायकवाड, जितेंद्र निगडे, प्रवीण कांबळे, किसन तांबे, सचिव भारत खोमणे, एस. के. हजारे, डॉ. रामचंद्र पवार, डॉ. अमोद मरकळे, सिकंदर शेख, संदीप जगताप आदी उपस्थित होते. स्पर्धेत पाचशे प्रकल्पांनी सहभाग घेतला होता. यास आजूबाजूच्या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व परिसरातील नागरिकांनी प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. दरम्यान, उद्योजक केतन देशपांडे यांनी एक लाखाचा धनादेश विज्ञान प्रदर्शनासाठी प्रदान केला.
उद्योजक केतन देशपांडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी संशोधन करत राहिल्यास त्यांना उद्योजक तर मदत करतातच. पण सरकारी पातळीवर नवीन कल्पनांना मदत करण्यासाठी स्कील इंडिया, स्टार्ट अप असे उपक्रम सुरू आहेत त्याचा लाभ घ्यावा.
पुरूषोत्तम जगताप म्हणाले, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिक्षणाला, संशोधनाला चालना देणारी व्यक्तिमत्वे आहेत. त्यांच्या विचारांतूनच या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर यांनी, अब्दुल कलाम यांच्या विचारांचा भारत घडविण्यासाठी विज्ञानच उपयोगी पडू शकते असे मत मांडले. जनतेचे दुःख, त्रास संपविण्याची ताकद फक्त विज्ञानात आहे.
प्रस्ताविक मुख्य समन्वयक डॉ. संजय देवकर यांनी केले तर आभार कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांनी मानले. 
To Top