सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा केला जातो.दरवर्षी तालुक्यातील उत्रौली, हर्णस,खानापुर,भोलावडे येथील गणेशमूर्तिकार हजारोंच्या संख्येने गणेशमूर्ती व गौराई घडविण्याचे काम करीत असतात.या गावांमधील गौराई व गणेशमूर्तींना शेगाव, लातूर,बूलडाणा, मुंबई, ठाणे, लालबाग, धुळे, गुजरात वापी,सुरत, बडोदा, दिल्ली, मद्राससह परदेशात इंग्लंड, अमेरिका येथे मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने मूर्तिकारांची गणेश मूर्ती बनवण्याची लगबग सुरू आहे. कोरोनाचा फटका मागील दोन वर्षात गणेश मूर्तीशाळांना कोरोनाचा फटका बसला होता.यामुळे व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती.मात्र कोरोना आटोक्यात आल्याने पुन्हा मुर्तीकारांनी जोमाने कामाला सुरुवात करून व्यवसाय पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला.तो सफल होत व्यवसाय सुस्थितीत सुरू आहेत.मात्र गणेश मुर्ती बनविण्याचा कच्चा मालाच्या किमती २० ते २५ टक्क्यांनी वाढल्या असल्याने मूर्तींच्या किमतीतही वाढ होणार असल्याचे चित्र आहे. सध्या गणेशमूर्तिकार गणरायांच्या मूर्तींवर शेवटचा हात फिरवून रेखीव ,सुबक व आकर्षक गणेशमूर्ति तयार करन्याच्या लगबगीत आहेत. मागील दोन वर्ष कोरोनाच्या काळात गणेश मूर्तींना मागणी होत नव्हती .यंदा गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे व मूर्तीही भरपूर बनवलेल्या आहेत .मात्र मूर्तींच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.असे मूर्तिकार यांच्याकडून सांगण्यात आले.