सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिरवळ ! सचिन चव्हाण
जागतिक पशुसंक्रमित आजार दिनानिमित्त उन्नत भारत अभियान अंतर्गत रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कुल,भोळी, ता. खंडाळा, जि. सातारा येथे पशु स्वास्थ्य विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ यांच्या वतीने दिनांक ६ जुलै २०२२ रोजी "जागतिक पशुसंक्रमित आजार दिन" साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे मा. सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. विलास आहेर आणि न्यु इंग्लिश स्कुल, भोळी मुख्याध्यापक, श्री एल. डी. उपार, यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे मा.सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. विलास आहेर यांनी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षक यांना मार्गदर्शन करताना पशुसंक्रमित आजार (झुनोसिस) म्हणजे पशु पक्षाद्वारे श्वानदंश, क्षयरोग, काळपुळी, सांसर्गिक गर्भपात, लेप्टोस्पायरा, माकड ताप इ. आजार माणसांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या होतात आसे सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेच्या अनुमानानुसार २०० पेक्षा जास्त रोग पशुपक्षापासून माणसांना संक्रमित होऊ शकतात. पशुसंक्रमित आजार बाधित पशुपक्षांशी थेट संपर्क, श्वास, लाळ, रोगग्रस्त पशुंचा चावा, दुध तसेच अप्रत्यक्षरीत्या गोचीड, पिसवा, डास यांच्यामार्फत पसरतात आणि हे टाळण्यासाठी गाय-म्हैस, शेळी- मेंढ्या, कुत्रा तत्सम पशूंना जंत व गोचीड निर्मूलन, लसीकरण तसेच होणारे आजाराचे निदान व त्यावरील उपचार करणे आवश्यक आहे असेही प्राध्यापक डॉ. विलास आहेर यांनी नमूद केले. डॉ राहूल कोल्हे यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना केली आणि एकात्मिक आरोग्याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. राजू शेलार यांनी सूत्रसंचालन आणि तनपुरे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.