सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पाचगणी : प्रतिनिधी
जिल्ह्यातील हेरवाड पहिली ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा एकमुखी ठराव घेतला. देशभरात या निर्णयाचे कौतुक होत असतानाच राज्य शासनाने एक परिपत्रक काढत आपापल्या गावातील विधवा प्रथा बंद करण्यासाठी पावले उचलावीत, असे आदेश दिले. त्यानुसार आज महाबळेश्वर तालुक्यातील भिलार ग्रामपंचायतीने परंपरागत सुरू असलेली ही अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ठराव घेतला आहे.
राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी करणारे भिलार हे गाव महाबळेश्वर तालुक्यातील पहिलेच गाव ठरले आहे.
सरपंच शिवाजी भिलारे, ग्रामसेवक राजेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली २९ जुलै रोजी एकमताने विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.यावेळी युवा नेते नितीन दादा भिलारे, प्रवीण भिलारे, राजेंद्र आबा भिलारे, किसन शेठ भिलारे, उपसरपंच सुनीता भिलारे, सदस्य वंदना भिलारे, वैशाली कांबळे, संदीप पवार , अनिल भिलारे, मंगल भिलारे, वैभव भिलारे, सारिका पवार, शंकर भिलारे आदी उपस्थित होते.
किसन शेठ भिलारे यांनी अनिष्ट प्रथा बंद करण्यासंदर्भात सुचवले व त्यास शंकरराव भिलारे यांनी अनुमोदन दिले. यावेळी वैशाली भिलारे, वंदना भिलारे, वैशाली कांबळे यांनी या ठरावाला पाठिंबा देताना सांगितले पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातली जोडवी काढणे यासारख्या प्रथांचे आजही पालन केले जाते. तसेच महिलेला विधवा म्हणून कोणत्याही प्रकारच्या धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही ही परिस्थिती आहे. कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार आहे. या प्रथेमुळे या अधिकारावर गदा येत असल्याने ही अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार भिलार ग्रामपंचायतीने केला आहे. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या राज्य सरकारनेही हेरवाड ग्रामपंचायत पॅटर्न सर्व राज्यात राबवण्याचे आवाहन केले होते त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ठराव करणारी भिलार ही महाबळेश्वर तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. त्यामुळे आता आगोदर स्ट्रॉबेरीचे गाव त्यानंतर देशातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून आणि आता विधवा ही अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ठराव करणारी महाबळेश्वर तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.