खंडाळा ! बजाज फायनान्सचा ग्राहक कार्यालयात जाऊन भरायचा रोख कर्जाचे हप्ते... ! पण मॅनेजरने त्याच्या खात्यावर पैसे न भराता हडपले दिड लाख रुपये

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
लोणंद : प्रतिनिधी 
लोणंद ता खंडाळा येथील बजाज फायनान्स कंपनीच्या मॅनेजरने ग्राहकाने कर्जाचे हप्ते भरण्यासाठी दिलेले एक लाख पंचावन्न हजार रूपये परस्पर हडपल्याची तक्रार लोणंद पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे.
        याबाबत सविस्तर हकिकत अशी की, लोणंद येथील सुरज सुभाष शेळके यांनी वैयक्तिक कारणावरुन बजाज फायनान्स कंपनीमधुन दोन लाख सोळा हजार तीनशे रुपये  पर्सनल लोन घेतले होते. सदर लोन चे हप्ते सुरज शेळके यांनी लोणंद येथील बजाज फायनान्सच्या ऑफिसमधे जावून 16/02/2021 रोजी कर्जाचा हप्ता पासष्ट हजार रुपये, त्यानंतर दिनांक 17/04/2021 रोजी पंन्नास हजार रुपये, त्यानंतर दिनांक 19/04/2021 रोजी चाळीस हजार रुपये असे एकुण एक लाख पंचावन्न हजार रुपये बजाज कंपनीची शाखा लोणंद येथील मॅनेजर चैतन्य विनोद खरात यांचेकडे जमा केले व त्यांचेकडून पैसे भरल्याची रितसर पावती घेतली होती. मात्र मे महिण्यापासुन बजाज फायनान्स कंपनीमधुन तक्रारदार यांना हप्त्यासाठी फोन येवु लागल्यानंतर सुरज शेळके यांनी ऑफिस मधे जावून मॅनेजर चैतन्य विनोद खरात याचेकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देवुन पैसे भरण्या बाबत टाळाटाळ करु लागल्याने तक्रारदार सुरज शेळके यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दि. 14 जुलै रोजी बजाज फायनान्सच्या मॅनेजर चैतन्य विनोद खरात याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली . या प्रकरणी लोणंद पोलीस अधिक तपास करीत आहेत .
To Top