चाकण ! हनुमंत देवकर ! चाकण-तळेगाव रस्त्यावर खड्ड्यांमुळे चाळण : रस्त्यांवर पावसाच्या पाण्यामुळे तळे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------ 
चाकण : हनुमंत देवकर
चाकण-तळेगाव रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याचे तीन तेरा वाजले आहेत. आठवडाभर चालू असलेल्या संततधार पावसामुळे आधीच असलेल्या छोट्या खड्ड्यांचे मोठ्या खड्ड्यांमध्ये रूपांतर झाले असून खड्ड्यांमध्ये पावसाच्या पाण्याची डबकी तयार झाली आहेत. पुणे-नासिक महामार्गावरील आंबेठाण चौकातील उड्डाणपूलाखाली व सेवांतर्गत रस्त्यावर, राणूबाईमळा येथे तळेगाव रस्त्यावर चक्क पावसाच्या पाण्याने तळे साचले आहे. या रस्त्यावर अक्षरश: खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 
      रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून वाहतुकीस अडथळा होवून खड्डे चुकविताना अपघातास सामोरे जावे लागत आहे. चाकण-तळेगाव रस्त्यावर अनेक ठिकाणी साईड पट्ट्याही खचल्या आहेत. चाकणच्या तळेगाव चौकात, युनिकेअर हॉस्पिटल समोर, महाळुंगे येथील मुख्य कमानीसमोर, कला जनसेट व प्रदीप लॅमिनेटर्स कंपनीसमोर, खराबवाडीत अनंतकृपा पतसंस्था व सारा सिटी कमानी समोर खड्डे पडून रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. खालुंब्रे गावच्या हद्दीत ह्युन्डाई चौकात मोठे खड्डे पडले आहेत. 
      महाळुंगे हद्दीत आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असून अवजड वाहनांची मोठी वाहतूक आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून हे खड्डे त्वरित बुजवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 
         मुंबई-नगर-औरंगाबाद हा चाकणहून जाणारा राष्ट्रीय महामार्ग अजूनही रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत अडकला आहे. या महामार्गावर तळेगाव दाभाडे, चाकण, रांजणगाव व औरंगाबाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहती वसल्या आहेत. या आद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना लागणारा कच्चा  माल व उत्पादित झालेला पक्का माल याची वाहतूक करण्यासाठी या रस्त्यावरून कंटेनर्स व ट्रेलर मधून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक केली जाते. त्यामुळे या रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी असल्याने वाहन चालक व स्थानिक नागरिक त्रस्त आहेत.  
          चाकण-तळेगाव रस्ता व चाकण-शिक्रापूर हा रस्ता दोनपदरी व साईड पट्ट्या उखडल्याने वाहतुकीची सतत कोंडी होत असून हे रस्ते रुंदीकरणाची मागणी जोर धरू लागली आहे. अशाच प्रकारे आळंदी फाटा ते एमआयडीसी रस्त्यावर कुरुळी व निघोजे हद्दीत अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. चुकीच्या उड्डाण पुलांमुळे आधीच त्रस्त झालेली जनता आता खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडी मुळे व रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वैतागली आहे. हे खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी उद्योजक विजय बोत्रे, सरपंच परिषदेचे अध्यक्ष आशिष येळवंडे, कामगार नेते जीवन येळवंडे, उदयोजक जीवन खराबी, खेड तालुका कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष गणेश बोत्रे, चाकण-तळेगाव रस्ता कृती समितीचे उपाध्यक्ष तुकाराम काळे, बाजार समितीचे माजी सभापती चंद्रकांतदादा इंगवले, पंचायत समितीचे माजी सदस्य शिवाजी वर्पे, शंकर बोत्रे आदींनी केली आहे.
To Top