सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर विद्यालयाच्या रस्त्याला अक्षरशः घसरगुंडीचे स्वरूप आले आहे.नेमका रस्त्यात चिखल की चिखलात रस्ता.. हे ओळखणे देखील मुश्कील झाले आहे. शाळेतील हजारो विद्यार्थ्यांना या चिखलमय रस्त्यावर रोज ये जा करावी लागत आहे. मात्र संबंधित विभाग झोपेचे सोंग घेत असल्याचा पालक आरोप करत आहे.
एकीकडे बारामती शहरामध्ये करोडो रुपयांचा विकासकामे होत असताना ग्रामीण भागात साधे रस्ते देखील मिळत नसल्याने नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे. सोमेश्वर कारखाना ते वाघळवाडी दरम्यान येणारा अवघ्या दोन किलोमीटरचा रस्ता देखील गेली कित्येक वर्षे केला जात नाही. याच रस्त्यावर प्राथमिक शाळा, आरोग्य उपकेंद्र, सोमेश्वर विद्यालय, ज्युनियर कॉलेज व वाघळवाडी ग्रामस्थ या रस्त्यावर ये जा करत असतात. मात्र गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावर घोट्या एवढा चिखल साचला असून या चिखलातून हजारो विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत आहे. आणि याच रस्त्यावरून कारखाना गळीत हंगामात उसाने भरलेल्या अवजड वाहनाची वाहतूक ही होते. दरम्यान पालखी काळात कारखान्याने या रस्त्यावर मुरूम टाकुन रस्त्याची डागडुजी केली होती.
मात्र संबंधित विभागाला हा रस्ता दिसणार तरी कधी असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.