सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
संगमनेर ता.भोर येथील जलशुद्धीकरण केंद्र सद्यस्थितीला बंद असून नागरिकांना नाईलाजाने नळ पाणी पुरवठाद्वारे येणारे गढुळ अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे.यामुळे गावात साथीचे आजार वाढले असून रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असून नागरिकांनी ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.
भाटघर धरणालगत संगमनेर गाव असून या गावाला धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. सध्याला पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणी माती मिश्रित होऊन अशुद्ध पाण्याची निर्मिती होत आहे. यामुळे हे पाणी पिल्याने साथीचे आजार होण्याची शक्यता असते.गावातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी २०१९ ला ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारी जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. परंतु सद्यस्थितीला हे केंद्र नादुरुस्त असल्याने गढूळ अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे याचा परिणाम वृद्ध व बालकांच्या आरोग्यावर अधिक पडलेला दिसून येत आहे.रुग्णांची दवाखान्यात गर्दी दिसून येत असून ग्रामपंचायतने लवकरात लवकर जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्त करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे.