सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नीरा खोऱ्यातील वीर धरण ९० टक्के भरले असून दुपारपर्यंत नीरा नदीत पाणी सोडण्याची शक्यता असल्यामुळे पाटबंधारे प्रशासनाने नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नीरा खोऱ्यातील निरा देवघर, भाटघर, वीर व गुंजवणी या धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या १२ दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
यावर्षी मान्सून पावसाने निरा खोऱ्याला हुलकवणी दिली असली तरी मात्र आषाढी पावसाने धरण पाणलोट क्षेत्रात दमदार सुरुवात केली आहे. आज दि १५ रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत भाटघर धरण क्षेत्रात ४४० मीमी पावसाची नोंद झाली असून ४७.६१ टक्के पाणी साठा झाला आहे. निरा देवघर धरण क्षेत्रात ९१५ मीमी पावसाची नोंद झाली असून ४०.६८ टक्के धरण भरले आहे. तसेच वीर धरण क्षेत्रात १६६ मी मी पावसाची नोंद झाली असून ९०.३८ टक्के धरण भरले आहे तर गुंजवणी धरण क्षेत्रात १०८५ मी मी पावसाची नोंद झाली असून ६५.७४ टक्के धरण भरले आहे.