सोमेश्वर रिपोर्टर टीम--
बारामती : प्रतिनिधी
डुकरांचा त्रास होत असल्याने स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेकडे तक्रार केल्याच्या रागातून वराह पालन करणाऱ्या व्यक्तीने आणि त्याच्या कुटुंबीयांनी महिलेला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रातल्या बारामतीत घडला. या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
बारामती शहरातल्या खंडोबानगर परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले की, आरोपी कुटुंबीयांनी खंडोबानगर परिसरात वराह पालन केले आहे. त्याचा त्रास स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होत होता. याबाबतची तक्रार स्थानिकांनी नगरपालिका तसेच पोलीस प्रशासनाकडे केली होती. आज बारामतीचे डीवायएसपी गणेश इंगळे यांच्यासमोर बैठकीत तोडगा काढण्यात येणार होता. त्यापूर्वी स्थानिक लोकांनी चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली. मात्र, पोलीस ठाण्यात जात असतानाच आरोपींनी महिलेला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. मागणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांनी तात्काळ दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.