सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नीरा डाव्या कालव्याच्या अस्तारीकरण विरोधात तालुक्यातील पणदरे, धुमाळवाडी, मानजीप्पावाडी,
कुरणेवाडी व पवईमाळ या गावांना सर्वात प्रथम नीरा डाव्या कालव्याच्या विरोधात एल्गार पुकारला असून अनेक ठिकणी शेतकऱ्यांनी कालव्याची काँक्रीटीकरण कामे बंद पाडलेली आहेत. जलसंपदा विभागाकडून सुरु असलेल्या निरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाला शेतकऱ्यांचा आता विरोध वाढू लागला आहे. सुरुवातीला पणदरे ग्रामस्थांनी याविरोधात एकत्र येत येथील अस्तरीकरण रोखले याच प्रमाणे बारामतीच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनाही आता एकजूट होत यावर आवाज उठवण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव करण्याची मागणी सोशल मिडीयातून होत आहे. नीरा ते कोऱ्हाळे येथे कालवा दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. बारामती व इंदापूर तालुक्याला वरदान ठरलेल्या वीर धरणावरून आलेल्या नीरा डाव्या कालव्याचे अस्तारीकरणाचे काम प्रगतीपथावर असून बागायती पट्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. कालव्यातून पाणी वाया जात असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे मात्र कालव्याची दुरुस्ती करून आतील गाळ काढून तो स्वच्छ करावा यामुळे पाणीगळती थांबणार आहे मात्र अस्तरीकरण नको असे शेतकरी म्हणू लागले आहेत.