सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील चोपडज ग्रामपंचायतीने स्थापनेपासूनच्या सर्व माजी सरपंचांचा सत्कार समारंभ आयोजित करून त्यांना सुखद धक्का दिला. तर करंजेपूल ग्रामपंचायतीने चालू वर्षापर्यंतची ग्रामपंचायतीची घरपट्टी व पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांच्या हस्ते तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते झेंडावंदन करून वेगळा पायंडा पाडला.
चोपडज ग्रामपंचायतीने अंगणवाडी, प्राथमिक शाळा येथे ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समिती अध्यक्ष, पोलिस पाटील व शाळा समितीच्या पदाधिकाऱ्यांना ध्वजारोहणाचा मान दिला. तर ग्रामपंचायतीच्या ध्वजवंदनाचा मान निवृत्त कर्नल जगदिश गाडेकर यांना देण्यात आला.पुष्पलता जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या स्वतंत्र दिनाच्या कार्यक्रमात सर्व माजी सरपंचांचा फेटे बांधून जाहीर सत्कारही करण्यात आला. वयस्क झालेल्या सरपंचांनी कृतज्ञता व्यक्त केली.
करंजेपूल ग्रामपंचायतीने चालू ज्या ज्या नागरिकांनी चालू घरपट्टी व पाणी पट्टी असे कर पूर्णपणे भरले होते अशांची यादी काढली. या यादीत फारच थोडे पण शक्यतो गरीब घरातील नागरिक निघाले. या नागरिकांच्या हस्ते झेंडावंदन करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. त्या निर्णयानुसार प्रथमच गरीब घरातील व्यक्तिना झेंडावंदनाचा मान मिळाला. स्वातंत्र्य दिनाच्या आधीच्या दिवशी ग्रामपंचायतचे ध्वंवजदन रंजना गोपीनाथ गायकवाड यांना करण्याची संधी मिळाली तर करंजेपूलच्या अंगणवाडी शाळेचे ध्वजवंदन प्रथमच इब्राहिम मुलाणी यांना करण्याचा अनपेक्षित मान मिळाला. करंजेपूल प्राथमिक शाळेच्या ध्वजवंदनाचा स्वातंत्र्य दिनाच्याच दिवशी मान अशोक सोमनाथ गायकवाड यांना प्रदान करण्यात आला तर अंगणवाडीच्या ध्वजवंदनाचा मान सुनिल गायकवाड या करमुक्त ग्रामस्थास देण्यात आला. याशिवाय अन्य ठिकाणी व शेंडकरवाडी प्रभागात ग्रामपंचायत सदस्यांना ध्वजारोहण करण्याची संधी प्राप्त झाली. ग्रामपंचायत इमारतीचे स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण सरपंच वैभव गायकवाड यांच्या हस्ते व ग्रामसेविका सुजाता आगवणे यांच्या उपस्थितीत झाले.