सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
मिनी कोकण समजल्या जाणाऱ्या भोर तालुक्यात मांगल्याचे प्रतीक असलेल्या आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन चैतन्यमय वातावरणात मोठ्या जल्लोषात बाप्पांची प्रतिष्ठापना करीत झाले.
यंदा निर्बंध मुक्तता असल्याने दोन वर्षानंतर हा दैदीप्यमान सोहळा साजरा होत आहे.बाप्पांच्या आगमनाचे स्वागत तालुक्यातील लहान,थोरांनी विशेषता महिलांनी पारंपारिक वाद्य ढोल ताशांच्या गजरात तसेच सनई चौघड्याच्या निनादात केले. मागील चार-पाच वर्षांच्या तुलनेत यंदा बाप्पांचे किमती आव्वाच्या-सव्वा झाल्या असल्या तरी उत्साहात गणेश भक्तांनी बाप्पांच्या मूर्ती खरेदी करून दुपारी २ वाजेपर्यंत घरोघरी बाप्पांची प्रतिष्ठापना केली.तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी दुपारी दोन नंतर कार्यकर्त्यांच्या सोयीनुसार बाप्पांना विराजमान केले. दोन वर्षानंतर हा सोहळा गणेश भक्तांना अनुभवयास मिळणार असल्याने बाप्पांच्या आगमनावेळी गणेश भक्त तसेच मंडळाचे कार्यकर्ते स्वागतासाठी भारावून गेले होते. तालुक्यातील हजारो गणेश भक्तांनी बाजारपेठेत गणरायाच्या उत्सव खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.
------------
पोलीस यंत्रणा सज्ज-----
भोर तालुक्यात गणेशोत्सव मोठ्या आनंदात दरवर्षी साजरा होतो. मागील दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा आनंदोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात होता.मात्र यंदा कोरोनातून निर्बंधमुक्त झाल्याने भक्तांमध्ये जल्लोष होता.या पार्श्वभूमीवर भोर तालुक्यात गणेशोत्सव काळात पोलीस यंत्रणा सज्ज असून २ अधिकारी,१२ कर्मचारी तर १२ होमगार्ड असा बंदोबस्त लावण्यात आला असल्याचे भोर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी सांगितले.