सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वरनगर (ता. बारामती) परिसरात डेंग्यू आजारासह निमोनिया आजाराने थैमान घातले असून परिसरातील खाजगी दवाखाने फुल्ल झाले आहेत.
खाजगी दवाखान्यातून ऍडमिट करण्याची जादा सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना मोठ्या दवाखान्यात पाठवावे लागत आहे.
परिसरातील वाणेवाडी गावातील विकासनगर व वाघळवाडी गावातील आप्पासाहेब जगताप नगरसह मुरूम, वाणेवाडी, निंबुत, करंजेपुल, वाघळवाडी या गावांमधून या आजाराने अक्षरशः थैमान घातले आहे. मात्र औषध फवारणीकडे ग्रामपंचायती दुर्लक्ष करत आहेत.
गेल्या एक महिन्यापासून सोमेश्वरनगर परिसरातील गावांमधून १०० च्या वर डेंग्यूचे तर ३० च्या वर निमोनियचे रुग्ण सापडले आहेत.
--------------------
डॉ. अमोल जगताप
मागील पंधरा दिवसांपासून या परिसरात असणाऱ्या रुग्णांना डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. मात्र रुग्णांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आलेली नाहीत. होळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सोमेश्वरनगर परिसरातील ग्रामपंचायतींना औषध फवारणी करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. काही ग्रामपंचायतीने गेल्या महिन्यात औषध फवारणी केली मात्र आता पुन्हा औषध फवारणी करण्याची गरज आहे. उघडी गटारे, जुने टायर, घरासमोरील साफसफाईबाबत जनजागृती करण्याची गरज असून कोणत्याही ग्रामपंचायती ग्रामस्थांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने घेत नसल्याचे यावरून दिसत आहे. कन्नडवस्ती आणि विकासनगर या भागात सर्वाधिक रुग्ण आहेत याशिवाय मुरुम, वाणेवाडी, वाघळवाडी आणि सोमेश्वर परीसरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.
---------------
कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन
साथीच्या आजारांचा सामना करण्यासाठी नागरिकांनी योग्य त्या उपाययोजना करून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. आरोग्य कर्मचाऱ्यांना याबाबत सर्व्हे करण्याच्या सूचना देण्यात येतील. ग्रामपंचायतींनी औषध फवारणी करण्यासाठी पत्र देण्यात आली आहेत. डेंग्यूवर जवळच्या आरोग्य उपकेंद्रात प्रतिबंधात्मक उपचार करण्यात येतील.
डॉ. मनोज खोमणे , तालुका वैद्यकीय अधिकारी
----------------------
डॉ. गणेश जगताप
परिसरातील वाघळवाडी, मुरूम, वाणेवाडी या गावांमधून डेंगू आणि निमोनियाचे जादा रुग्ण आढळत आहेत. खाजगी दवाखान्यात रात्रीच्या वेळेला रूग्णांना ऍडमिट करण्याची सोय नसल्याने रुग्णांना मोठ्या हॉस्पिटलला पाठवावे लागत आहे.