बारामती ! सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयामध्ये ‘वृक्षमित्र’ उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना झाडांचे वाटप

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर विज्ञान महाविद्यालय, महाविद्यालयाचा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने ‘वृक्षमित्र’ या उपक्रमाची सुरुवात झाली. 
         सदर उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षसंवर्धन, वृक्षलागवड व वृक्षसंगोपणासोबतच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध विषयांचे मार्गदर्शन मिळण्यासाठी निसर्गअभ्यासकांची चर्चासत्रे व काही कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून पहिला वृक्ष वाटपाचा कार्यक्रम आज पार पडला ज्यामध्ये बेहडा, पिंपळ, रतनगुंज, करंज इत्यादि झाडांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी रोपांची उपलब्धता सोमेश्वर कारखान्याचे विद्यमान संचालक श्री. ऋषिकेश गायकवाड यांनी करून दिली. या कार्यक्रमा दरम्यान महाविद्यालयामद्धे प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला एका वृक्षाचे रोप देण्यात आले. दिलेले हे रोप विद्यार्थ्याने घरच्या अथवा गावाच्या परिसरामध्ये लावायचे आहे व त्याचे संगोपन करत असताना दर महिन्याला त्याचा एक फोटो काढून महाविद्यालयाच्या पोर्टल वर पाठवायचा आहे. विद्यार्थ्याकडून वर्षा मध्ये आलेले सर्व फोटो गोळा केले जाणार असून निकाल मिळण्यापूर्वी महाविद्यालयामार्फत या उपक्रमाचा डिजिटल अल्बम तयार केला जाणार आहे अशी माहिती कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी असलेले शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री. भारत खोमणे यांनी दिली. या कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामचंद्र पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयामध्ये अश्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांची सर्वांगीण वाढ होत असते व त्यासाठी या वर्षामध्ये एकूण २२ उपक्रम आयोजित केले असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख व या उपक्रमाचे आयोजक प्रा. श्री. शुभम ठोंबरे यांनी केले. प्रा. श्री. धनंजय बनसोडे यांनी मनोगत व प्रा. श्री. राजेश निकाळजे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
To Top