सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
20 वर्षांपूर्वी " लहानपण देगा देवा " या नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने सोमेश्वरनगर परिसरातील युवक युवती कलाकारांनी मिळून सांस्कृतिक चळवळ उभी केली होती,यातील सचिन भिलारे, सोमनाथ लिंबरकर सारखे कलाकार मराठी हिंदी मालिका, चित्रपटात देखील झळकले . व्यवसाय,नोकरीं च्या निमित्ताने अनेक कलाकार बाहेर पडल्याने ही चळवळ थांबली, परंतु तब्बल 20 वर्षानंतर हे सर्व कलाकार आज एकत्र येऊन कायमस्वरूपी सांस्कृतिक चळवळ उभी करण्याचा सर्वांनी निर्धार केला.
सोमेश्वरनगर येथे झालेल्या या बैठकीला किरण आळंदीकर, संतोष शेंडकर, नारायण सावंत, बाबुलाल पडवळ, राजू बडदे, राजू बालगुडे, तानाजी करचे इ. कलाकार सदस्य उपस्थित होते तर सुषमा क्षीरसागर या स्त्री कलाकाराने व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठकीला हजेरी लावली.
या निमित्ताने सोमेश्वरनगर परिसरातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होणार असून,परिसरातील काही मंडळींना, हौशी कलाकारांना सोबत घेऊन वेबसिरीज, पथनाट्य, समाजप्रबोधन कार्यक्रम, लघुपट ते मोठ्या चित्रपटापर्यंत निर्मिती करण्याचा मनोदय या वेळी उपस्थित कलाकार सदस्यांनी व्यक्त केला.