बारामती ! अमृत महोत्सवानिमित्त शिवलिंगाला तिरंगी साज : श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान येथे ७० हजार भाविकांची मांदियाळी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----  
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सलग लागून आलेली सुट्टी, संकष्टी चतुर्थी व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या ध्वजारोहनानंतर सोमेश्वर देवस्थान येथे दर्शनासाठी भक्तांचा सागर लोटला. आज तिसऱ्या श्रावणी सोमवारी तब्बल ७० हजार भाविकांनी हर हर महादेवाच्या जयघोषात शिवलिंगाचे दर्शन घेतले.  
        करंजे (ता. बारामती) येथील प्रसिद्ध श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिरात तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त पहाटेपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या सुमारे ७० हजार भाविकांनी स्वयंभूशिवलिंगाचे दर्शन घेतले. सलग आलेल्या सुट्यांमुळे मंदीर परीसरात मागील दोन सोमवारपेक्षा उच्चांकी गर्दी पहायला मिळाली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमीत्ताने स्वयंभू शिवलिंगावर तीन रंगात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. मुबंई, कोकण, पुणे, सातारा, नगर आदी जिल्ह्यातील भाविकांनी उपस्थिती दाखवली होती. 
           मध्यरात्री बारा वाजता बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रताप भांडवलकर, सचिव राहुल भांडवलकर व विश्वस्त कमिटी यांच्या उपस्थितीत महापुजा पार पडली. यावेळी सोमेश्वरचे संचालक संग्राम सोरटे, सभापती प्रमोद काकडे,  सरपंच वैभव गायकवाड, जया गायकवाड, उपसरपंच बाळासाहेब शिंदे उपस्थित होते. राजहंस पतसंस्थेचे व्यवस्थापक विजयकुमार सोरटे, जनार्दन सोरटे, शत्रुघ्न होळकर, धीरज गायकवाड आणि परीसरातील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून भाविकांसाठी दिवसभर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तर सायंकाळी रामदास डोईफोडे व बाळासाहेब कडव - सातारा यांच्या वतीने प्रसादाची सोय करण्यात आली. माळेगाव येथील अंजंठा डेकोरेटर्स चे अमोल चव्हाण यांनी मंदीर परीसराला फुलांची आकर्षक सजावट केली होती.देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी मोफत पार्किंग, पिण्याच्या पाण्याची आणि भक्तनिवासात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. होळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने डॉ. ज्ञानदीप राजगे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांनी  भाविकांसाठी मोफत औषधोपचाराची सोय केली होती. बारामती आगाराच्या वतीने यात्रा स्पेशलसाठी जादा गाड्यांची सोय करण्यात आली होती. अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दुपारी दोन वाजता बारामतीचे अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी मंदीरात भेट देत शिवलिंगाचे दर्शन घेतले. तथास्थु हॉस्पिटलचे डॉ सतीश चव्हाण व डॉ आनंद सोनवणे यांच्या वतीने भाविकांची सर्व रोगदान शिबीराचे राबवण्यात आले होते.  
          वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सोमनाथ लांडे आणि कर्मचाऱ्यांनी यात्राकाळात चोख बंदोबस्त ठेवला होता. मंदीर परीसर मिठाई, हार- फुले, खेळणी, विविध दुकानांनी गजबजून गेला होता. दिवसभरात सत्तर हजारपेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतले असल्याची माहिती देवस्थान समितीने दिली. 
To Top