सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जावली : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोयनेचे सुपुत्र ना.एकनाथजी शिंदे हे दोन दिवस दि. ११ व १२ ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे तर्फ तांब तालुका महाबळेश्वर या गावी दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत असून,आज त्यांचा दरे निवासस्थानी मुक्काम असणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे येथील त्यांच्या नंदनवन या निवासस्थानातून दुपारी साडेबाराच्या सुमारास मोटारीने महाबळेश्वर कडे प्रस्थान करतील. महाबळेश्वर येथून सायंकाळी सहाच्या सुमारास तापोळा येथे मुख्यमंत्र्यांचे आगमन होईल.
तापोळा येथील पद्मावती देवी मंदिरात मुख्यमंत्र्यांचा कोयना भाग १०५ गावच्या वतीने व तापोळा ग्रामस्थांकडून जंगी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.भागातील नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सत्काराचा स्वीकार करतील तसेच मान्यवरांच्या शुभेच्छा देखील स्वीकारणार आहेत. येथील कार्यक्रम आटोपल्यावर मुख्यमंत्र्यांचा ताफा तरफ्यातून पलीकडे गाढवली येथून दरे गावी मुक्कामी जाणार आहेत. आज रात्री निवासस्थानी मुक्काम केल्यावर उद्या शुक्रवार दिनांक १२ रोजी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुभहस्ते ग्रामदैवत जननी देवीच्या मंदिरात देवीच्या मूर्तीला अभिषेक, पूजा अर्चा,आरती होणार असून दुपारी एक वाजता मुख्यमंत्री पुनश्च आलेल्या मार्गाने मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत.
मात्र गेली दोन दिवस तापोळा बामणोली कांदाटी खोरे या संपूर्ण परिसरात धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे व वादळी वाऱ्याने ठिकठिकाणी विद्युत पोल पडल्याने बहुतांश भाग हा अंधारात असून लाईट अभावी बीएसएनएलचे नेटवर्क नसल्याने संपूर्ण १०५ गावे आऊट ऑफ कव्हरेज क्षेत्र दाखवत आहेत.कोयनेचे सुपुत्र एकनाथजी शिंदे हे गावी दौऱ्यावर येत असताना नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीने या भागातील लाईट व नेटवर्क सेवा ठप्प झाली आहे.