सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कोऱ्हाळे बुद्रुक - हेमंत गडकरी
माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या माध्यमातून तालुक्याच्या प्रत्येक गावात कोट्यावधी रुपयांचा निधी आला आहे. त्यामुळे मतदारांनी आगामी प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात व पंचायत समितीच्या गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपर्क दौरा आयोजित करण्यात आला आहे. वडगाव सांगवी गटाच्या दौऱ्यानिमित्त पक्षाचे पदाधिकारी कोऱ्हाळे बुद्रुक येथे आले होते.
यावेळी बोलताना सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप पुढे म्हणाले की हे अस्थिर सरकार आहे. या सरकारचे पुढे काय होईल हे सांगता येत नाही. मात्र हे सरकार निधी अडवण्याचे काम करत आहे. मात्र निधी आणण्यासाठी अजितदादा खंबीर आहेत. तालुक्यातील अनेक गावात कोट्यावधी रुपयांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत. १४० लहान मोठे पुल मंजूर झाले आहेत. काही पक्ष निवडणुकीपुरते येतात मात्र निवडणुका झाल्या की गायब होतात. परत दिसत ही नाहीत.
लोकांच्या भावना लक्षात घेवून दादांनी नीरा डावा कालव्याचे अस्तरीकरण बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दादा नेहमी शेतकऱ्यांचा विचार करतात. मात्र काही लोक याला पक्षीय वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा आपण दादांच्या शब्दावर नेहमी विश्वास ठेवत आलो असून आता ही विश्वास ठेवूया.
यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व कुठल्याही विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले. चर्चेत पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रदीप धापटे, अनिल शिंदे, डी जी माळशिकारे, अजित माळशिकारे, नंदकुमार खोमणे, शब्बीर मुलाणी, प्रवीण खोमणे, सुनील शिंदे, हेमंत गडकरी यांनी चर्चेत सहभाग घेतला.
यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष धनवान वदक, सोमेश्वर कारखान्याचे संचालक प्रवीण कांबळे, रणजित मोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच रवींद्र खोमणे यांनी केले सूत्रसंचालन ज्येष्ठ कार्यकर्ते मुगुटराव भगत यांनी केले तर आभार सुनील भगत यांनी मानले.