सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
मॉरीशस देशातील मॉरिशस मराठी मंडळ फेडरेशन यांच्यावतीने भोर तालुका पत्रकार संघाचे सदस्य प्राध्यापक विजय जाधव यांना 'आंतरराष्ट्रीय डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मूकनायक पत्रकारीता पुरस्कार' जाहीर झाला. मॉरिशस येथील मोका शहरात दि. २७ सप्टेबर २०२२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उद्घाटन प्रसंगी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मॉरीशसचे राष्ट्राध्यक्ष मा. पृथ्वीराजसिंग रुपन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्राध्यापक विजय जाधव यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. भोरमधील फुले-शाहू -आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, राजगड ज्ञानपीठाचे अनंतराव थोपटे विद्यालय आणि मॉरिशस मधील मॉरिशस मराठी मंडळ फेडरेशन या संस्थांचे प्रतिनिधी या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती फुले -शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. रोहिदास जाधव यांनी दिली. प्रा. विजय जाधव हे गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.जाधव यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुक्यातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.