सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुणे : प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासन, पुणे कार्यालयातर्फे आरोग्यास अपायकारक ‘पफ वनस्पती’ विक्रेत्यांवर कारवाई करुन १० लाख ५८ हजार ३८० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
मार्केट यार्ड पुणे येथे अचानक छापे टाकून घाऊक विक्रेत्यांकडून विश्लेषणासाठी घेण्यात आलेल्या वनस्पती हा अन्न पदार्थ आरोग्यास अपायकारक असल्याचा अहवाल प्राप्त होताच घाऊक विक्रेते व वितरकांकडील उर्वरित साठा जप्त करण्यात आला.
पफ वनस्पती (ग्रेड शेफ ब्रँड) या अन्न पदार्थाचे घाऊक विक्रेत्याकडे तपासणी करुन नमुना घेऊन उर्वरित ३ लाख ५२९ रुपये किंमतीचा १ हजार २८८ किलो साठा, तसेच वनस्पती पफ (सेंच्युरी ब्रँड) चा ४ जाख ३७ हजार ९६६ रुपये किंमतीचा २ हजार ५३ किलो साठा असा एकूण ७ लाख ३८ हजार ४९५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
त्याच दिवशी सदर वनस्पतीच्या वितरकाकडे तपासणी केल्यानंतर पफ वनस्पती (ग्रेड शेफ ब्रँड) चा नमुना घेवुन उर्वरित ६६ हजार ९७६ रुपये किंमतीचा ४७८ किलो साठा तसेच पफ (सेंच्युरी ब्रँड)चा २ लाख ५२ हजार ९०९ रुपये किंमतीचा १ हजार ८७३ किलो साठा असा ३ लाख १९ हजार ८८५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये सहायक आयुक्त (अन्न) बा. म. ठाकुर, ग. पां. कोकणे, अन्न सुरक्षा अधिकारी नि. बा. खोसे, अ. सु. गवते आदींनी भाग घेतली.
येणारे सण-उत्सवाचे दिवस लक्षात घेता प्रशासनातर्फे खाद्यतेल, वनस्पती, तूप, मिठाई, खवा, बेसन आदी अन्न पदार्थाच्या विक्रेत्यांवर लक्ष ठेऊन अयोग्य खाद्यपदार्थ आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे सह आयुक्त (अन्न) संजय नारागुडे यांनी कळविले आहे.