सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
जलसंपदा विभागाकडुन निरा डावा कालव्याच्या दुरूस्तीचे काम करण्यात येणार असुन ते काम सध्या निरा पाटबंधारे व सोमेश्वर पंचकोशीमध्ये सुरू झालेले आहे. सदर कामामध्ये कॅनॉलमध्ये तळासहीत प्लॅस्टीक कागद टाकुन अस्तरीकरण करण्यात येणार असुन त्यानुसार पाटबंधार विभागाने सर्व तयारी केली सदर कामाचे टेंडर झालेले असुन ठेकेदारांकडुन लवकरच काम सुरू होणार आहे अशी माहिती समजली. वास्तविक गेल्या १४० वर्षांपासून कॅनॉल वाहत असुन मग आत्ताच कॅनॉलचे अस्तरीकरणाची काय गरज भासली. कॅनॉलच्या पाण्याचे योग्य पध्दतीने नियोजन होण्यासाठी पाणीवापर संस्थांवर जर लक्ष दिले तरी पाणी बचतीचा उद्देश सफल होवु शकतो. त्यामुळे शेतकरी कृती समितीच्या वतीने कॅनॉलच्या अस्तरीकरणाचे काम तात्काळ बंद करून ते रद्द होण्यासाठी मा. अधिक्षक अभियंता साो. पुणे पाटबंधारे मंडळ, सिंचन भवन पुणे, मा. कार्यकारी अभियंता साो. पुणे पाटबंधारे विभाग पुणे व मा. उपविभागीय अधिकारी साो. निरा पाटबंधारे उपविभाग निरा यांना लेखी निवेदन देण्यात आलेले आहे.
बारामती प्रमाणे तळासहीत अस्तरीकरण झाल्यास कॅनॉल मधुन होणारा पाण्याचा पाझर कायम स्वरूपी १०० टक्के बंद होवुन पाण्याच्या जलसाठ्यामध्ये परिणाम होवुन मोठी समस्या निर्माण होईल. निरा व सोमेश्वर परिसर फक्त कॅनॉल मुळे बागायती आहे. कॅनॉलच्या आसपासची जेऊर, मांडकी, पिंपरे, निरा, निंबुत, गुळूंचे, राख, खंडोबाचीवाडी, गडदरवाडी, वाघळवाडी, वाणेवाडी, मुरूम, करंजे, करंजेपुल, सोरटेवाडी, शेंडकरवाडी, मगरवाडी, चौधरवाडी, होळ, वडगांव, कोन्हाळे बु।।, कोन्हाळे खुर्द, लाटे व शिरीष्णे ही गावे सुध्दा याच पाण्यावर अवलंबुन आहेत. कॅनॉलचे अस्तरीकरण झाल्यास खालील नमुद केल्याप्रमाणे गंभीर जलसंकट पुढील काळामध्ये ओढवणार आहे.
१. गावातील अनेक बोअर, चारी आणि विहिरींचे पाणी कायमस्वरूपी जाईल.
२. शेकडो हेक्टर वरील पिके प्रामुख्याने उस शेती धोक्यात येईल.
३. निरा पाटबंधारे व सोमेश्वर पंचकोशीमधील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याची कायमची समस्या निर्माण होईल.
४. दुग्ध व्यवसाय आणि पोल्ट्री व्यवसाय अशा अनेक शेती आधारीत उद्योग संकटात येतील.
५. वन विभागातील अनेक वन्यजीव आणि झाडे नष्ट होतील,
६. शेतकन्यांसहीत पंचक्रोशीतील शेतमजुर, गावातील व्यापार व अर्थकारणावर याचा मोठा परिणाम होईल.
७. शेतकऱ्यांनी कोट्यावधी रूपयांचे कर्ज काढुन कॅनॉल लगत विहीरी आणि पाईपलाईन यासाठी खर्च केल्याने अस्तरीकरण झाल्यास शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही.
८. कॅनॉलला अस्तरीकरण झाल्यास मानवी व पशु यांच्या जिवीतास धोका निर्माण होईल. कारण बारामती शहरामध्ये कॅनॉलला अस्तरीकरण झाल्यानंतर आत्ता पर्यंत कॅनॉलमध्ये पडुन ५ मृत्यु झालेले आहेत असे ही कळते. जर वीर धरण ते कठीण पुला पर्यंत अस्तरीकरण झाल्यास किती निष्पापशेतकऱ्यांचे बळी जातील व याला जबाबदार कोण?
तरी या सर्व कारणांमुळे निरा पाटबंधारे व सोमेश्वर पंचकोशीमधील गावांचा तळासहीत प्लॅस्टीक कागद टाकुन अस्तरीकरण करण्यास पुणे जिल्हा शेतकरी कृती समिती सोमेश्वरनगर, कॅनॉल बचाओ समिती निरा पाटबंधारे, सोमेश्वर पंचकोशी व पंचक्रोशीतील शेतकरी यांचा तीव्र विरोध आहे. ज्याप्रमाणे बारामती शहरातील कॅनॉलला तळासहीत प्लॅस्टीक कागद टाकुन अस्तरीकरणाचे काम केलेने दोन कि.मी पर्यंतच्या बहुतांश बोअर व विहीरी कोरड्या पडलेल्या आहेत. तरी या गोष्टींचा गांभिर्याने विचार करून कॅनॉलमध्ये तळासहीत प्लॅस्टीक कागद टाकुन अस्तरीकरणाचे काम तात्काळ बंद करून ते रद्द करण्यात यावे यासाठी शेतकरी कृती समिती, कॅनॉल बचाओ समिती व निरा पाटबंधारे, सोमेश्वर पंचकोशीतील सर्व शेतकरी बांधवांनी मंगळवार दि. ३०/०८/२०२२ रोजी सकाळी ११.०० ते २.०० या वेळेत लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय निरा-मोरगाव रोड, निरा येथे अस्तरीकरणाचे काम बंद करणेकामी आप आपले मत व्यक्त करून याबाबत पुढील दिषा ठरविण्यासाठी राजकिय जोडे बाजुला ठेवुन सर्वांनी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, तसेच परिसरातील सर्व गावांनी आप-आपल्या ग्रामसंभाचे अस्तरीकरणास विरोध असले बाबतचे ठराव करून ते कृती समितीकडे देण्यासाठी संपर्क साधावा. अथवा कार्यक्रमा दिवशी सदर ठराव घेवुन यावेत असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
_______________--
सतिशराव शिवाजीराव काकडे
अध्यक्ष, पुणे जिल्हा शेतकरी कृती समिती व कॅनॉल बचाओ समिती
बारामती व इंदापुर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात उस पिक घेतले जाते व त्यावर प्रकिया करण्यासाठी अनेक सहकारी साखर कारखाने असुन भविष्यात त्याचे उस क्षेत्र कमी झाल्यास त्या संस्थेच्या अर्थिक परिस्थतीवर गंभीर परिणाम होणार आहेत. त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांनी कॅनॉल अस्तरीकरणास विरोध करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असताना ते कारखान्यांचे चेअरमन मुग गिळुन गप्प बसलेले आहेत. आज बहुतेक साखर कारखान्यांनी करोडो रूपयांचे कर्ज काढुन विस्तारीकरण केलेले आहे. परंतु जर उस क्षेत्रच कमी झाले तर या कर्जाची परफेड कशी होणार? तरी कॅनॉल अस्तरीकरणास विरोध करण्यासाठी प्रत्येक कारखान्याच्या चेअरमन यांनी पुढाकार घ्यावा व आपआपल्या मतदार संघातील संचालकांवर सर्व शेतकऱ्यांनी दबाव आणला पाहिजे. तसेच साखर कारखान्यांच्या येणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कॅनॉल अस्तरीकरण काम बंद करून ते रद्द करणे बाबतचा ठराव करण्यात यावेत. असे आवाहन शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे.