सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
एकुलता एक मुलगा... म्हणून आई वडिलांकडून पहिजे तो लाड पुरवला जातो..गाडी, मोबाईल कपडे...सगळं काही..स्वतःची शिक्षणाच्या नावाने बोंब ...म्हणून बाहेरील गावावरून शिक्षण घेण्यासाठी आलेल्या मुलींना त्रास देणे...बापाने दिलेल्या गाडीत बापाच्याच पैशाचे पेट्रोल टाकून...डोळ्यावर २० रुपयांचा गॉगल लावून मुलींना त्रास देण्याचे सर्रास प्रकार बारामती तालुक्यातील पश्चिम भागात घडताना दिसत आहेत. शाळा सुटण्याच्या वेळेत ...शाळेच्या प्रवेशद्वारावर रोडरोमिओ बसतात दबा धरून...बसत असल्याचे निदर्शनास येते आहे.
सोमेश्वरनगर परीसरात रोडरोमियोंची संख्या वाढली असून शाळा व महाविद्यालये परीसरात विनाकारण घिरट्या घालणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालक करत आहेत. सोमेश्वर परीसराची शैक्षणिक हब म्हणून ओळख होत आहे. परीसरात जवळपास दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. फलटण, खंडाळा, पुरंधर, बारामती आदी तालुक्यातील विविध गावातून विद्यार्थी शिक्षणासाठी सोमेश्वर येथे ये - जा करत असतात. मात्र शाळा आणि महाविद्यालये सुटल्यानंतर रस्त्यावर, महाविद्यालयाच्या गेटसमोर, तर कधी थेट विद्यालयातच हे रोडरोमियो आपल्या दुचाकीवरुन विनाकारण चकरा मारत असतात. मुलांकडून प्रसंगी हातवारे, इशारे करून विद्यार्थींना नाहक त्रास देण्याचे प्रकार सरासपणे सुरू आहे. वडगाव निंबाळकर अंतर्गत येणाऱ्या करंजेपुल पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांचा धाक नसल्याने या प्रकारात वाढ झाली असल्याचा आरोप पालक करत आहेत.
-------------------
संवेदनशील प्रश्नाकडे शिक्षकांनीही लक्ष देण्याची गरज आहे.
पोलिसांनी गांभीर्याने या प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा चुकीच्या घटना घडण्याची शक्यता आहे.वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात काम केलेले बळवंत मांडगे आणि गजानन गजभारे या सिंघम पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या काळात रोडरोमियोंची महाविद्यालयात जावून थेट धुलाई केली होती यामुळे त्यांचा दरारा निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पोलिस त्यांच्यावर गुन्हे दाखल करत नाहीत त्यामुळे असे विद्यार्थी पोलिसांचा गैरफायदा घेत आहेत. पोलिसांनी याबाबतीत पालकांनाही समज देण्याची गरज आहे. सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सोमेश्वर इंजिनिअरिंग महाविद्यालय, सोमेश्वर पॉलटेक्निकल व विज्ञान महाविद्यालय, मु. सा. काकडे महाविद्यालय, सह्याद्री महाविद्यालय, उत्कर्ष आश्रमशाळा तसेच वाणेवाडी, मुरूम, करंजे भागशाळा, सोरटेवाडी याठिकाणी हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी ये- जा करतात. शाळा- महाविद्यालये अनेक तरूण निरा- बारामती रस्त्यावर घिरट्या मारताना दिसतात त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज पालक व्यक्त करत आहेत.
.......................
शाळा- महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले ओळखपत्र जवळ बाळगावे. पालकांनीही आपल्या मुलांना समज देत दुचाकी वापरण्यावर बंधन घालावे. यापुढील काळात शाळा- महाविद्यालय परीसरात विनाकारण फिरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
योगेश शेलार - पोलिस उपनिरीक्षक वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे.