सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : दौलतराव पिसाळ
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वाई तालुका ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षपदी बावधन येथील जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते विलासराव पिसाळ यांची निवड करण्यात आली असून वाई तालुका काँग्रेस पक्षाची पुनरर्चना करण्यात आली असल्याची माहिती मावळते अध्यक्ष रवींद्र भिलारे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जानेवारी ते जुलै या कालावधीत सभासद नोंदणीचा कार्यक्रम पूर्ण करुन बूथ स्तरापासून राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत सर्व पदाधिकारी निवडण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली. माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी वाई तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करुन विलासराव पिसाळ यांची अध्यक्षपदी निवड केली असल्याचे जाहीर केले. तसेच यावेळी एक प्रदेश प्रतिनिधी, सहा जिल्हा प्रतिनिधी, तीन तालुका उपाध्यक्ष, एक खजिनदार व तीन तालुका कार्यकारणी सदस्यांचीही निवड करण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले. उर्वरित पदाधिकारी व कार्यकारणीची निवड लवकरच करण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले.
विलासराव पिसाळ हे गेली तीस पस्तीस वर्षे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. संघटनात्मक कामाचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. यापूर्वी तालुका काँग्रेसचे सरचिटणीस व उपाध्यक्ष तसेच जिल्हा काँग्रेस कार्यकारणीचे सद्स्य म्हणून त्यांनी काम केले होते. मागील दोन वर्षांपासून जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून ते कार्यभार सांभाळत होते. तसेच बावधन गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद सर्वाधिककाळ भूषवून अत्यंत प्रभावी काम केले आहे. आता काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षपदाची महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. वाई तालुक्यात काँग्रेस पक्ष अतिशय अडचणीत असताना व संघटनात्मक पातळीवर मोठी पडझड झाली असल्याच्या पार्श्वभूमीवर आलेली ही जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने यशवीपणे पार पाडू व वाई तालुक्यातील काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे या निवडीनंतर विलासराव पिसाळ यांनी सांगितले.
मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन विलासराव पिसाळ यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र शेलार, मलकापूरचे उपनगराध्यक्ष व कराड दक्षिण ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा सेवादलाचे अध्यक्ष प्रताप देशमुख, वाई तालुका काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रताप यादव, मावळते तालुका अध्यक्ष रवींद्र भिलारे, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस जयदीप शिंदे, जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष विराज शिंदे, वाई तालुक्यातील काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते कल्याण पिसाळ, विशाल डेरे, शहाजी पिसाळ, बाबा खुडे आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. निवडीनंतर या सर्वांनी विलासराव पिसाळ यांचे अभिनंदन केले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, हरणाई सह. सूत गिरणीचे अध्यक्ष व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रणजितसिंह देशमुख, रयत सह. साखर कारखान्याचे चेअरमन व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर, किसन वीर कारखान्याचे जेष्ठ संचालक बाबासाहेब कदम, सातारा तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष व किसन वीर कारखान्याचे संचालक संदीप चव्हाण, खंडाळा कारखान्याचे संचालक चंद्रकांत ढमाळ, एस, वाय. पवार, जावळी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी बाबुराव शिंदे, जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष सुनील भोसले, सातारा शहर काँग्रेसच्या अध्यक्षा रजनीताई पवार, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पनाताई यादव, वाई काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रदीप जायगुडे, जिल्हा काँग्रेसचे सेक्रेटरी अतुल सकपाळ तसेच वाई तालुक्यातील कार्यकर्त्यांनी व बावधन ग्रामस्थांनी विलासराव पिसाळ यांचे अभिनंदन केले.