सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथे बुधवारी भरलेल्या बैलपोळ्याच्या बाजारावर लम्पीचे सावट असल्याने खरेदी - विक्रीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसुन आले. तसेच बैलांची संख्या दिवसेंदिवस घटल्याचा परिणाम उलाढालीवर झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. येथील बाजारात येवला, राशीन, नांदगाव, लोणार, माढा, शिर्डी, जामखेड, राहता, पंढरपूर, बार्शी, श्रीरामपूर, घोडेगाव, बीड करमाळा, आदी ठिकाणाहुन लहान - मोठे २२५ व्यापारी आले होते. यावेळी बाजारात घुंगर माळ, दृष्ट् माळ, कवडी माळ, बकरी पट्टा, सातारी पट्टा, चांगळी पट्टा, बेसन मोरकी आदी तयार वस्तु विक्रीसाठी होत्या. तर लोकरीचे सार, गोंडे शेंब्या आदींना चांगली मागणी होती. कातडी वाणात लेझरपट्टा, घागरमाळ, मोरकी व पितळीवाणात घाटी, घुंगरे, तोडे, शेंबी तसेच बोरकडी आदी वस्तु व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी ठेवल्या होत्या. यावेळी खिलारी जनावरांची संख्या घटल्याने फॅन्सी वाणांची मागणी घटल्याची माहिती पंढरपूर येथील व्यापारी भगवान म्हस्के यांनी दिली. दरवर्षी प्रमाणे सुत, नायलॉन, रेशीम, रेडीमेड माल तसेच चायना वस्तुंच्या किमतीत वाढ नसली तरी यावर्षी व्यवसायात मंदी जाणवत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यावर्षी ५० टक्के व्यवसाय झाला नसल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मागिल अनेक वर्षापासुन बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने त्याचा उलाढालीवर परिणाम होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. दरम्यान बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की लम्पी या विषाणुजन्य सांसर्गिक रोगामुळे बैलपोळ्याला निघणाऱ्या मिरवणुकीवर निर्बंध आले आहेत. लम्पी हा संसर्गजन्य रोग असल्याने त्याचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. तसेच तालुक्यात कुठेच बैलपोळ्याची मिरवणुक काढु नये असा आदेश वरिष्ठांकडुन आला असल्याची माहिती पाटील यांनी दिली. ------------------------------